नागपूर : दिवाळीचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे. हा आनंद फटाक्यांच्या आतषबाजीने साजरा होणार आहे. मात्र, फटाक्यांमुळे वायुप्रदूषणासह ध्वनिप्रदूषणाचीही समस्या निर्माण होते. अशावेळी नागपूरकरांनीच ध्वनिप्रदूषणाचा डेटा गोळा करावा, असे आवाहन राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी)ने केले आहे.
नीरीतर्फे दिवाळीदरम्यान दरवर्षी वायू प्रदूषणासह ध्वनिप्रदूषणाचा डेटा गोळा केला जातो. यावर्षी नागरिकांनीच हा डेटा गोळा करावा, असे नियोजन नीरीने केले आहे. उल्लेखनीय म्हणजे नीरीच्या वैज्ञानिकांनी ध्वनिप्रदूषण मोजण्यासाठी 'नॉइस ट्रॅकर ऍप ' विकसित केले. कोरोना महामारीदरम्यान लॉकडाऊनमध्ये आणि लॉकडाऊननंतर लोकांच्या सहभागातून ?पद्वारे ध्वनिप्रदूषणाचा डेटा गोळा करण्यात आला. याअंतर्गत १०० च्यावर व्हॉलेंटिअरद्वारे ७०० ठिकाणचे मॉनिटरिंग करण्यात आले होते.
हे नियोजन दिवाळीच्या काळातही करण्यात येत आहे. लोकसहभागातून ध्वनिप्रदूषणाच्या मॉनिटरिंगची पद्धत जगभरात स्वीकारली जाते. कमी वेळात मोठ्या प्रमाणात डेटा गोळा करण्याची ही सोपी पद्धत मानली जाते. मागील वर्षी दिवाळीच्या काळात हा प्रयोग करण्यात आला व शहरातील अनेक प्रतिनिधी सहभागी झाले. यावेळीही ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान नॉइस ट्रॅकर ऍप द्वारे मॉनिटरिंग करण्याचे व पर्यावरण कार्यकर्ते, तरुण व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन नीरीने केले आहे. ९४२३६३००१६, ७०६६०८३५५३ या क्रमांकावर हा डेटा शेअर करण्याची सूचना करण्यात आली आहे.