नागपूर : पहाटेच्या गुलाबी थंडीत सामावलेली अनोखी उर्जा, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील उत्साह अन् जागोजागी ऐकू येणाऱ्या स्फुर्तीदायक घोषणा ... ठीक सहा वाजून चौदा मिनीटांनी प्रत्येकाच्या ह्रद्याचे ठोके वाढू लागले...फाईव्ह, फोर, थ्री, टू अॅन्ड....वन ! मान्यवरांची झेंडा दाखविला अन् सुरू झाला धावण्याचा एक रोमांचक प्रवास. प्रशिक्षित अॅथलिट्सपासून ते अगदी नवखे धावपटू, सहा वर्षांच्या मुलापासून ते सत्तरीपर्यंतचे ‘तरुण’ अन महिला काय , संत्रानगरीची एक नवी ओळख झालेल्या ‘लोकमत महामॅरथॉन’मध्ये स्वत:शीच स्पर्धा करण्यासाठी प्रत्येक जण जीव तोडून धावताना दिसून आला.
कुणी सामाजिक जागृतीसाठी धावत होता, कुणी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तर कुणी हौस व मज्जा म्हणून बेफाम सुटला होता. मात्र सर्वांची जिद्द व चिकाटी सारखीच होती. आरसी प्लास्टो पाईप ॲंड टॅंक प्रेझेंट सातव्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ने आणखी एक इतिहास घडविला. संपूर्ण महाराष्ट्रासह मध्य भारतासाठी आकर्षणाचे केंद्र बनलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ला मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील महाप्रतिसाद लाभला. कस्तुरचंद पार्क येथे हजारो धावपटूंची गर्दी झाली होती.
ढोलपथकाने वेधले लक्ष
दरम्यान, पहाटेपासूनच संविधान चौकाच्या परिसरात ढोलताशांचे स्वर निनादू लागले होते. क्रीडा अन् संस्कृतीचा एक अनोखा मिलाप तेथे पहायला मिळाला. स्पर्धकांच्या उत्साहाला आणखी वाढविण्याचे कार्य नागपुरच्या राष्ट्रवंदना ढोलताशा पथकाच्या कार्यकर्त्यांनी केले. पन्नासहून अधिक जणांनी मिळून ढोलताशांच्या माध्यमातून स्पर्धकांचे दणक्यात स्वागत केले.
विदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांचे ‘टीमस्पिरीट’
लोकमत महामॅरेथॉनमध्ये केवळ विदर्भ व मध्य भारतच नव्हे तर अगदी विदेशातील धावकदेखील दिसून आले. विविध देशांतून नागपुरात शिकण्यासाठी आलेल्या पाच विद्यार्थ्यांनी तर एकत्र धावून ‘टीमस्पिरीट’ दाखविले. यात ॲना (बेल्जिअम), स्केई (अमेरिका), पैगे (अमेरिका), फिलिप (जर्मनी) व फ्रॅन्कोईस (फ्रान्स) यांचा समावेश होता. हे सर्व विद्यार्थी पाच किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये धावले व अगदी सहजतेने त्यांनी त्यांचे उद्दीष्ट पूर्ण केले. हे सर्व विद्यार्थी अकरावीत असून ते शहरातील एका नामांकित सीबीएसई शाळेत ‘स्टुडंट्स एक्स्चेंज प्रोग्राम’अंतर्गत नागपुरात आले आहेत. नागपुरात मागील वर्षभरापासून असणाऱे हे विद्यार्थी नागपुरातील संस्कृतीमुळे चांगलेच प्रभावित झाले आहेत. शहरातील काही कुटुंबांमध्ये राहून ते देशाच्या संस्कृतीत रमले आहेत. कुठलेही वय असो शारिरीक तंदुरुस्ती ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. ‘लोकमत महामॅरेथॉन’मधून ‘हेल्थ इज वेल्थ’ हा मौलिक संदेश जनतेमध्ये जात असून ही चळवळ व्हावी असे प्रतिपादन ॲनाने ‘लोकमत’शी बोलताना केले.