नागपूर : 'गोल्डन गर्ल' अशी ख्याती असलेली १९ वर्षांची आंतरराष्ट्रीय महिला मुष्टियोद्धा अल्फिया अक्रमखान पठाण हिने नागपूरच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला. जॉर्डनमधील अम्मान शहरात सुरू असलेल्या एएसबीसी आशियाई एलिट बॉक्सिंग स्पर्धेत शुक्रवारी अल्फियाने ८१ किलो गटात सुवर्णपदक जिंकले. वरिष्ठ गटात पदार्पणात अल्फियाचे हे पहिले विजेतेपद आहे. अशी कामगिरी करणारी महाराष्ट्राची ती पहिली मुष्टियोद्धा ठरली.
अल्फियाचे वडील अक्रमखान यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्फियाने स्थानिक दावेदार इस्लाम हुसैलीवर सहज मात करीत कारकिर्दीत चौथ्या सुवर्णावर नाव कोरले. लढतीच्या पहिल्या फेरीत अल्फियाने प्रतिस्पर्धी खेळाडूवर ठोशांचा प्रहार केल्यामुळे हुसैली प्रतिकारयोग्य नसल्याचे रेफ्रीच्या लक्षात आले. रेफ्रीने आरएसएम (पंचांनी लढत थांबविणे) नियमानुसार पुढील लढत थांबवून अल्फियाला विजयी घोषित केले. अल्फियाने याआधी यूथ आणि ज्युनियर गटाचे सुवर्णपदक जिंकले होते.
सुवर्ण अपेक्षितच होते : अल्फिया
दरम्यान, जॉर्डन येथून 'लोकमत'शी बोलताना अल्फिया म्हणाली, 'या स्पर्धेत मला सुवर्णाची अपेक्षा होतीच. फायनलमध्ये मी आधीच्या तुलनेत अधिक आक्रमक होते. पहिल्या फेरीअखेर रेफ्रीने लढत थांबवताच मो सुवर्ण निश्चित झाले. आता मी राष्ट्रीय वरिष्ठ गट स्पर्धेवर लक्ष केंद्रित करणार आहे. अल्फियाचे वडील अक्रम खान हे नागपूर पोलीस दलात सहायक उपनिरीक्षक आहेत. त्यांनी मुलीच्या या कामगिरीमुळे माझे परिश्रम यशस्वी झाल्याचे सांगितले. अल्फियाच्या पराक्रमानंतर घरच्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कोच गणेश पुरोहित यांनीही आपल्या युवा शिष्येच्या कामगिरीची मुक्तकंठाने प्रशंसा केली.