नागपूर : उपराजधानीचे वैभव असलेल्या अंबाझरी तलावाचे अस्तित्व संकटात सापडले आहे. नाईक तलाव आणि सक्करदरासारख्या तलावांना अक्षरश: नष्ट करणाऱ्या जलपर्णी म्हणजे इकाॅर्निया या वनस्पतीचा विखळा सध्या अंबाझरी तलावाला पडला आहे. पाण्यातील ऑक्सिजन संपवून मासे व तलावातील इतर जैवविविधतेला नष्ट करणारी जलपर्णी आता अंबाझरी तलावाला गिळंकृत करण्याच्या तयारीत आहे.
शेतात जसे तण असते तसे नद्या किंवा तलावात जलपर्णी असते. सुंदर अशी फुले आणि पाण्यावर तरंगणारी पसरट पाने आकर्षक वाटत असली तरी ही वनस्पती एखाद्या राक्षसापेक्षा कमी नाही. पर्यावरण अभ्यासक प्रा. शुभांगी जंगले यांच्या मते सर्वात वेगाने वाढणाऱ्या वनस्पतींमध्ये इकाॅर्नियाचा समावेश हाेताे. एका वर्षात एक वनस्पती तीन हजारांहून अधिक बियांची निर्मिती करू शकते. त्या बियांचे आयुष्य वीस वर्षांपर्यंत असते. ती पाण्यावर तरंगणारी असल्याने तिचा प्रसार झपाट्याने होतो आणि नियंत्रण करणे कठीण जाते. पसरट पानांमुळे ही वनस्पती वातावरणातील ऑक्सिजन तलावाच्या तळापर्यंत पाेहचू देत नाही. जलपर्णीच्या अनियंत्रित वाढीमुळे माशांना पुरेसे ऑक्सिजन मिळणे थांबते आणि मासे मरायला लागतात. त्यांचे उत्पादन घटते. तलावातील इतर सजीव, वनस्पती व जैवविविधता नष्ट हाेते. ऑक्सिजन घटल्याने पाण्याचा गढूळपणा वाढताे व दर्जा खराब हाेताे. हळूहळू तलावच नामशेष व्हायला लागतो.
जलपर्णी म्हणजे ‘बंगालचा आतंक’
जलपर्णी ही भारतीय वनस्पती नसून दक्षिण अमेरिकेतील आहे. भारतावर इंग्रजांचे राज्य असताना तिच्या आकर्षक फुलांना भाळून जाॅर्ज माॅर्गन नामक ब्रिटिश अधिकाऱ्याने एका काचेच्या भांड्यात ती काेलकात्याला आणली हाेती. तेव्हा काेलकाता ही देशाची राजधानी हाेते. इकॉर्नियाच्या आकर्षक रूपावर भाळून गेल्या शंभर वर्षांत ८० देशांतील पर्यटक, वनस्पती अभ्यासक आदींनी ती आपापल्या देशात नेली. मात्र तिची झपाट्याने वाढ हाेत असल्याने तेव्हा मुख्य व्यवसाय असलेल्या मासेमारीवर संकट आले हाेते. त्यामुळे जलपर्णीला बंगालचे आतंक असेही म्हणतात.
जलपर्णी म्हणजे धाेकादायक राक्षस
- झपाट्याने वाढणाऱ्या या वनस्पतीमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होते.
- पाण्यावर सूर्यप्रकाश पडण्यात अडथळा ठरत असल्याने इतर जीवांसाठी धोकादायक ठरते.
- घरातून निघणारे सिवेज व सांडपाण्यात या वनस्पतीची वाढ झपाट्याने हाेते.
- पाण्यातून डासांची उत्पत्ती होऊन मलेरिया रोग पसरतो, हेसुद्धा संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
- वैनगंगा नदी इकॉर्निया वनस्पतीमुळे प्रदूषित झाली होती. मासोळ्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन त्याचा मोठा फटका मत्स्य व्यवसायाला बसला होता.
- नागपुरातील नाईक तलाव नामशेष हाेत असून सक्करदरा तलाव पूर्णपणे प्रदूषित हाेण्याच्या मार्गावर आहे.
- इकॉर्निया असलेल्या नदीचे पाणी प्रदूषित हाेत असून मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.
- मासे व इतर जलचर प्राण्यांसाठी घातक ठरत आहे.
कशी नष्ट करावी?
रासायनिक तणनाशकाच्या साह्याने जलपर्णीचे नियंत्रण करण्याचेही प्रयोग झाले आहेत पण त्याला मर्यादा आहेत. जलपर्णीचे नैसर्गिक शत्रू असलेल्या किड्यांच्या (वॉटर हायसिंथ बीटल) साह्याने जलपर्णीचे नियंत्रण करण्याचे प्रयोग झिम्बाब्वे, केनिया, अमेरिका आदी देशांत यशस्वी झाले आहेत. जलपर्णीवर वाढणाऱ्या बुरशीच्या साह्यानेही तिचे नियंत्रण शक्य आहे; पण अद्याप व्यावसायिक पातळीवर ते उपलब्ध नाही.