लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना घर मालकाच्या मदतीने बजाजनगर पोलिसांनी कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने, विदेशी चलन तसेच अत्यंत महत्त्वाचे शैक्षणिक कागदपत्र चोरून नेले. या प्रकरणाची तक्रार करूनही पोलीस दोषीवर कारवाई करायला टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप पीडित भाडेकरू डॉ. शिवशंकर दास तसेच डॉ. क्षिप्रा उके आणि भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल शेंडे, मुकेश खडतकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला. पीडितांना तातडीने न्याय न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भीम आर्मीकडून यावेळी देण्यात आला.दास आणि उके हे दोघेही जेएनयूचे पीएचडीधारक आहेत. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगरात त्यांनी जगदीश लांबे यांच्याकडून २०१५ मध्ये भाड्याने घर घेतले. त्यावेळी ११ महिन्यांचा करार करण्यात आला होता. पुढे करारात वाढ करण्यास घरमालक यांनी नकार दिला. मात्र दुसरे घर मिळेपर्यंत १० टक्के भाडेवाढ करून तेथेच राहण्यास सहमती दिली. दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आम्ही मागासवर्गीय असल्याचे कळल्यानंतर घरमालकाचा मुलगा तुषार लांबे यांनी घर खाली करण्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. न्यायालयामार्फत नोटीस दिली. हे प्रकरण न्यायालयात आहे. दरम्यान ८ सप्टेंबर २०१८ ला आम्ही दिल्लीत असताना तुषार लांबेसह बजाजनगरचे तीन पोलिस विनोद क्षीरसागर, प्रमोद मोहित आणि संजय सिंग ठाकूर आमच्या घरी आले. कोणतीही नोटीस न देता त्यांनी घराचे कुलूप तोडले. घरातील सर्व सामान गच्चीवर फेकले. विदेशी चलन, सोन्याचे दागिन्यांसह लाखोंचे साहित्य चोरून नेले.याच्यासोबत शैक्षणिक कागदपत्रे आणि रिसर्चचे अहवालही चोरून नेले. दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर हा सर्व प्रकार दिसला. त्याची बजाजनगर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. प्रथम त्यांनी तक्रार घेण्यास नकार दिला. नंतर वरिष्ठांच्या आदेशावरून बजाजनगर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. मात्र एफआयआरमध्ये चुकीची माहिती मांडली.चार महिन्यांत आठ तपास अधिकारीघरमालकाच्याविरोधात अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाला. मात्र, पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही. चार महिन्यात आठ तपास अधिकारी बदलण्यात आले असून कारवाईची तत्परता दाखवण्यास पोलीस तयार नाही. आम्ही मागासवर्गीय असल्यामुळेच हा अन्याय केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. यावेळी भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते.