लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कस्तूरचंद पार्क लगतच्या निमार्णाधीन किंग्जवे हॉस्पिटलच्या इमारतीमधील भव्य ऑडिटोरियमला बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आग लागली. ऑडिटोरियममधील सोफा व फोमला आग लागल्याने सर्वत्र धूर पसरला. आगीत अडकलेले १२ कामगार धुरात गुदमरल्याने बेशुद्ध पडले. त्यांना उपराचासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. पोलीस तसेच स्थानिक नागरिकांनीही यासाठी मदत केली. मेयो रुग्णालयात नऊ कामगारांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात उमेश येरपुडे(४०), योगश डेहनकरे(२५), राजेंद्र शर्मा(२५), धर्मिन वर्मा(४०), उमाबाई भंडारी(४०), जनाबाई निर्मलकर (४०), गणेश पेटकर, राहुल कावळे व पलाश लोहे आदींचा समावेश आहे. रामकृष्ण मौर्य, रामू मौर्य व वेंकटरमण नायडू यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील रामकृष्ण मौर्य, रामू मौर्य यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. नजीकच्या एलआयसी कार्यालयाजवळ परवाना मेमोरियल ट्रस्टच्या निर्माणाधीन नऊ मजली इमारतीतील दुसऱ्या व तिसऱ्या माळ्यावर एक हजार आसन क्षमतेच्या ऑडिटोरियमचे बांधकाम सुरू आहे. तर वरच्या माळ्यावर एसपीएनव्ही कॉर्पोरेशनच्या किंग्जवे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे काम सुरू आहे. येथे १५० कामगार कामावर आहेत. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास लंच टाईममध्ये ऑ डिटोरियमला अचानक आग लागली. आगीचे निश्चित कारणे पुढे आले नाही. मात्र ऑडिटोरियमध्ये वेल्डिंगचे काम करताना शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. फोमचा सोफा व खुर्च्यांनी पेट घेतल्याने थोड्याच वेळात आग संपूर्ण ऑडिटोरियमध्ये पसरली. फोममुळे सर्वत्र विषारी धूर पसरला. आगीतून जीव वाचविण्यासाठी कामगार मिळेल त्या मार्गाने इमारतीच्या बाहेर पडले. परंतु अनेक कामगार आगीत अडकले. धुरामुळे काही जण बेशुद्ध पडले. थोड्याच वेळात अग्निशमन विभागाचे पथक व सीताबर्डी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला.
अग्निशमन विभागाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण आणण्यासोबतच लोकांच्या मदतीने आगीत बेशुद्ध पडलेल्या कामगारांना बाहेर काढून उपचारासाठी मेयो रुग्णालयात रवाना केले. घटनास्थळी आठ ते दहा रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या.