मोरेश्वर मानापुरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सामान्य महिलांचा विचार केल्यास बँकिंग क्षेत्रात त्या अजूनही मागे आहेत. संगणक आणि मोबाईलच्या काळात त्यांना बँकिंग व्यवहाराची बारीकसारीक माहिती करून देणे तेवढेच महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत विविध उपक्रम राबवून गृहिणींच्या आर्थिक सक्षमीकरणाची जबाबदारी स्वीकारायला द धरमपेठ मल्टीस्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या संस्थापक अध्यक्षा नीलिमा बावणे यांनी पुढाकार घेतला.नीलिमा बावणे या स्वत: एकॉनॉमिक्स विषयात एम.ए. आहेत. महिलांच्या विकासासाठी त्यांनी अलीकडेच महिला अध्यापन (वुुमेन स्टडीज) या विषयात एम.ए. ही पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. त्या सांगतात, महिलांचा मूळ स्वभाव बचतीचा आहे. त्यांच्या आर्थिक विकासाचा ध्यास घेऊन आमची सोसायटी कार्य करीत आहे. सोसायटीच्या ३९ शाखांमध्ये ९० टक्के महिला कार्यरत आहेत. महिलांना बचतीची सवय लागावी आणि त्यांनी बँकिंग खाते सुरू करावे, यासाठी सोसायटी वारंवार मोहीम राबविते. यासाठी तीन वर्षांपूर्वी ‘बँकिंग व्हील’ योजना सुरू केली. बँकिंग व्हील हे वाहन संबंधित भागात जाऊन बचतीसाठी खाते उघडण्यासाठी महिलांना प्रोत्साहित करते. या माध्यमातून असंघटित कामगार महिलांना जोडले आहे. अडचणीत बचतीचा पैसा त्यांच्याच कामी येतो. शिवाय महिलांना उद्योजिका बनविण्याचे सोसायटीचे मिशन आहे. अनेकांनी गृहउद्योग यशस्वीरीत्या सुरू केले आहेत.त्यामुळे त्यांची समाजात पत निर्माण झाली आहे. महिलांना बचतीवर अर्धा टक्के जास्त व्याज देण्यात येते. लहानसहान व्यवसाय करणाऱ्या महिलांचे स्वत:च्या घराचे स्वप्न सोसायटीमुळे पूर्ण झाले आहे. सोसायटीची स्थापना १७ मे १९९४ ला धरमपेठ येथे झाली. आता सोसायटीचा व्याप मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात आहे. शाखांमध्ये युवती व महिलांना नोकरी मिळावी आणि त्यांच्यात बँकिंगची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने तज्ज्ञांतर्फे त्यांना तीन महिन्यांचे बँकिंग प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणार्थींना शाखांमध्ये नोकरी दिली आहे. महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी धरमपेठेतील मुख्य शाखेत गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. बचतीच्या माध्यमातून प्रत्येक महिलेने आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असा मोलाचा सल्ला बावणे यांनी दिला.
बचतीच्या माध्यमातून केले नागपूरच्या स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या सक्षम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 10:54 AM
विविध उपक्रम राबवून गृहिणींच्या आर्थिक सक्षमीकरणाची जबाबदारी स्वीकारायला द धरमपेठ मल्टीस्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या संस्थापक अध्यक्षा नीलिमा बावणे यांनी पुढाकार घेतला.
ठळक मुद्दे९० टक्के महिलांना दिला रोजगार अनेकांना उद्योजिका बनविण्याचे ‘मिशन’