लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रखरखत्या उन्हात उभे राहून कर्तव्याच्या नावाखाली अग्निपरीक्षा देणाऱ्या वाहतूक पोलिसांना वरिष्ठांकडून ‘कूल वेस्ट जॅकेट’ च्या रुपाने गारवा देणारी भेट मिळाली आहे. हे जॅकेट घालून पोलीस रखरखत्या उन्हाचा सहज सामना करू शकणार आहे.येथील एन कॉप्स्मध्ये सुरू करण्यात आलेल्या व्हर्च्युअल क्लासरूमचे पोलीस महासंचालक (डीजी) सतीश माथूर यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. यावेळी अतिरिक्त महासंचालक जगन्नाथन, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे, नक्षल विरोधी अभियानाचे महानिरीक्षक शरद शेलार उपस्थित होते.या कार्यक्रमानंतर वाहतूक शाखेच्या पोलिसांना डीजींच्या हस्ते ‘कूल वेस्ट जॅकेट’चे वितरण करण्यात आले. हे जॅकेट विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. ते स्वेटरसारखे सहज (हलके) आहे. हे जॅकेट बाहेरच्या तापमानापेक्षा ६ डिग्री तापमान कमी ठेवते. विशेष म्हणजे, रखरखत्या उन्हात ते अंगात घातल्यानंतर एक ते दोन मिनिटातच कार्यान्वित होते आणि घालणाऱ्याला नैसर्गिक गारव्याची अनुभूती देते.नागपूरचा उन्हाळा घाम फोडणारा आहे. अनेकांचे तर उन्हाळ्यात नागपुरात येण्याच्या नावानेही डोके गरम होते. अशात विविध नेत्यांचा बंदोबस्त आणि दैनंदिन कर्तव्याचा भाग म्हणून वाहतूक पोलिसांना भर उन्हात उभे राहून आपले कर्तव्य बजवावे लागते. कर्तव्याच्या नावाखाली वाहतूक पोलिसांची ही अग्निपरीक्षाच ठरते. ते लक्षात घेता गृहमंत्रालयाच्या परवानगीने पोलीस महासंचालनालयाने वाहतूक पोलिसांसाठी ‘कूल वेस्ट जॅकेट’ आणले आहे. ते उपलब्ध झाल्याने वाहतूक शाखेच्या पोलिसांना हुरूप आला आहे.
कर्तव्य बजावणे सुकर होईलवाहतूक शाखेच्या पोलिसांची वेगवेगळे बंदोबस्त आणि कर्तव्यामुळे नेहमी धावपळ होते. उन्हाच्या तडाख्याने या धावपळीमुळे पोलिसांच्या प्रकृतीला धोका होऊ शकतो. मात्र, या जॅकेटमुळे पोलिसांना तीव्र उन्हातही कर्तव्य बजावणे सुकर होईल, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी या संबंधाने नोंदवली.