सुरभी शिरपूरकर
नागपूर : मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा. उपराजधानीत पिवळी मारबत उत्सव गेल्या १३७ वर्षांपासूनच अविरत साजरा करण्यात येतो. तर काळ्या मारबतीला सुद्धा १४१ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. बैल-पोळ्याच्या म्हणजेच मोठ्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्ह्या पोळ्याला मारबत बडग्याच्या मिरवणूक शहरातून काढली जाते. या अभिनव प्रथेच्या माध्यमातून वर्षभर देशात घडलेल्या चांगल्या वाईट घटनांवर भाष्य करणारे बडगे (मोठे पुतळे) तयार केले जातात.
देशात फक्त नागपुर शहरातच हा उत्सव साजरा केला जातो. नागपूर शहरातील लाखो नागरिक ही मारबत मिरवणूक बघण्यासाठी रस्त्यावर येत असत. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्यावर्षी मारबत मिरवणूक काढली गेली नाही मात्र यंदा हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरने १३७ व १४१ वर्षांपासून चालत आलेल्या ऐतिहासिक वारशाचं जतन केलं आहे. बडग्या-मारबत परंपरेमुळे नागपूरला वेगळी ओळख मिळाली आहे.
काळी आणि पिवळ्या मारबतीचं महत्त्व
काळी आणि पिवळी मारबतीसह बडगे तयार केले जातात. मारबत म्हणजे वाईट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेचं दहन आणि चांगल्या परंपरा आणि विचारांचं स्वागत. महाभारत काळाचा संदर्भदेखील या उत्सवाला दिला जातो.
श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी आलेल्या पुतना मावशी प्राचीन काळी मारबत आणि लोकांचं रक्षण करणारी पिवळी मारबत अशा दोन विशाल मूर्ती तयार केल्या जातात.
इंग्रजी राजवटीत जनता त्रस्त होती. परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी तसेच देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी सत्याग्रहींच्या गुप्त बैठकांसाठी १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तेली समाज बांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली. त्यावेळी दिवंगत आप्पाजी व बटानजी भाऊ खोपडे यांनी बांबुच्या कमच्या व कागद लावून ३ ते ४ फूट उंचीची बाहुलीसारखी मारबत तयार करून लोकांच्या मदतीने शहरात तिची मिरवणूक काढली. नाईक तलावात तिचे विसर्जन करण्यात आले. तर १९१३-१४ मध्ये लक्ष्मणराव व रामाजी खोपडे यांनी गणपतराव शेंडे यांच्याकडून २० फूट उंचीची बैठकी पिवळी मारबत तयार करून घेतली. त्यानंतर समाजातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन मारबतीचा उत्सव सुरू केला. काळ्या मारबतीला १४१ वर्षांचा, तर पिवळ्या मारबतीला १३७ वर्षांचा इतिहास आहे.
इंग्रजांच्या काळात देशात नागरिकांना एकत्र येण्यासाठी टिळकांनी ज्या पद्धतीने पुण्यात गणेशोत्सव सुरु केला. त्याच धर्तीवर नागपूर येथे मारबत उत्सव सुरु करण्यात आला. गणेशोत्सवापेक्षा देखील जुना उत्सव मारबत आहे. प्राचीन काळात अनेक रूढी परंपरा होत्या; ज्या मानव जातीसाठी घातक ठरत होत्या. त्यांचं प्रतीक म्हणजे काळी मारबत. तर ज्या चांगल्या परंपरा आहे त्याच प्रतीक म्हणजे पिवळी मारबत.
काळी व पिवळी मारबत शहीद चौकात एकत्र आल्यानंतर खऱ्या मिरवणुकीला प्रारंभ होतो. येथे दोन्ही मारबतींची गळाभेट होते. गळा भेटीनंतर बडकस चौक, महाल गांधीगेट, गांजाखेत मार्गे नाईकतलाव येथे त्यांचे विसर्जन केले जाते.
नागपूरसह विदर्भाच्या अनेक भागातील लोक मारबतीची मिरवणूक पाहायला येतात. या उत्सवाला मिळणारा नागरिकांचा प्रतिसाद आणि उत्साह आजही कायम आहे.