लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशविदेशातील विविध शहरे हे तेथील ‘लेझर अॅन्ड लाईट शो’साठी प्रसिद्ध आहेत व त्यांना पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटक तेथे जातात. आता नागपूर शहरदेखील जागतिक शहरांच्या पंक्तीत सहभागी होणार आहे. फुटाळा तलावात संगीत कारंजे तसेच ‘मल्टिमीडिया शो’ची सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे याच्या माध्यमातून फुटाळ्याच्या पाण्यावर नागपूरचा इतिहास व संस्कृती रेखाटण्यात येणार आहे. ‘लाईट्स’, ‘साऊंड’ व ‘लेझर शो’च्या माध्यमातून चालणाऱ्या या ‘शो’चे नियोजन व आखणी ही जागतिक दर्जाचे कलाकार व तंत्रज्ञ करत आहेत हे विशेष.बुधवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. संगीताच्या तालावर नाचणाऱ्या पाण्याच्या कारंज्यावर नागपूरचा इतिहास मांडण्यात येईल. यात नागपूरचा तीन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास, बख्त बुलंदशहाचे कार्य, रघुजी राजे भोसले यांचा राज्याभिषेक, ब्रिटिशांनी घेतलेला ताबा, १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात नागपूरचे योगदान, १८९१ तसेच १९२० च्या कॉंग्रेसच्या सभा, महात्मा गांधींना अटक व सीताबर्डी किल्ल्यातील त्यांचे वास्तव्य, केशव बळीराम हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास, भारत छोडो आंदोलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृती व दीक्षाभूमीचा इतिहास, शहराचे आजचे स्थान इत्यादींवर ‘मल्टिमीडिया शो’ व ‘लेझर शो’च्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात येईल. सोबतच येथे संगीत कारंजे वेगवेगळ्या गाण्यांवर चालेल. यात वेळेप्रमाणे व उत्सवानुसार बदलदेखील करण्यात येईल. शास्त्रीय, पॉप संगीताचादेखील यात समावेश असेल. प्रत्येक ‘शो’चा शेवट हा देशभक्तीपर गीतांनीच होईल.आंतरराष्ट्रीय पातळीवर तज्ञांचे नियोजनया संपूर्ण प्रकल्पाचे कंत्राट फ्रान्सच्या एका कंपनीला देण्यात आले आहे. ‘मल्टिमीडिया शो’ व संगीत कारंज्याची ‘सिग्नेचर ट्यून’ ही ए.आर.रहमान बनविणार आहेत. तर याला शब्दबद्ध गुलजार करणार आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री रेवती या कलादिग्दर्शन करणार आहेत. तर अल्फोन्सो रॉय हे तंत्रनिर्देशन करतील. ‘साऊंड डिझायनिंग’ हे ऑस्कर पुरस्कार विजेते रेसुल पोकुट्टी हे करतील.विवेकानंदांच्या जीवनकार्यावर प्रकाशसोबतच अंबाझरी येथील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याच्या परिसरातदेखीलदेखील अशाच पद्धतीने ‘मल्टिमीडिया शो’ सुरू करण्यात येईल. यात स्वामी विवेकानंदांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात येईल. शिकागो येथील त्यांच्या ऐतिहासिक भाषणावर आधारित ‘सिग्नेचर ट्यून’ येथील विशेषता असेल.