लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात वर्षभरापासून औषधांचा तुटवडा आहे. वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात ४० टक्के औषध असल्याचे सांगतात. प्रत्यक्षात मात्र, साध्या तापाचेही औषध मिळत नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत. सध्याच्या स्थितीत दहा दिवस पुरेल एवढाच औषधांचा साठा असल्याने रुग्णांच्या जीवावर हे रुग्णालय उठल्याचे बोलले जात आहे.कामगारांचे आरोग्य सांभाळले जावे यासाठी नागपुरात कामगार विमा रुग्णालय स्थापन करण्यात आले. या कामगारांकडून वर्षाला कोट्यावधी रुपये रुग्णालयाला मिळतात. याच पैशांतून रुग्णालयातील डॉक्टरांपासून ते कर्मचाऱ्यांचे पगारही होतात. परंतु त्याच रुग्णालयात कामगार रुग्णांची हेळसांड होत असल्याचे चित्र आहे. शासन या रुग्णालयाकडे लक्ष देत नसल्याने रुग्णांसोबतच रुग्णालय प्रशासनाला करावे काय, हा प्रश्न भेडसावत आहे. रुग्णालात गेल्या वर्षभरापासून औषधांचा तुटवडा आहे. केवळ आकस्मिक औषधे खरेदी करून कसेतरी भागविले जात होते. सध्याच्या स्थितीत रुग्णालयात दहा टक्केही औषधांचा साठा नसल्याचे या रुग्णालच्या अभ्यागत मंडळावर असलेले सदस्य व राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक)चे सचिव मुकुंद मुळे यांनी लेखी लिहून दिले आहे. त्यांनी औषधांसोबतच ५० टक्के रिक्त पदांमुळे बंद होत असलेला एक-एक वॉर्ड, अद्ययावत यंत्रसामुग्री व सोयीच्या अभावाने रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात ‘रेफर’ करण्याचे वाढते प्रमाण, रुग्णालयाचे वेळापत्रक पाळत नसलेले डॉक्टरांमुळे प्रभावित झालेली रुग्णसेवा आदी समस्याही त्यांनी मांडल्या आहेत.
दोन वर्षापासून बालरुग्णांवर अन्याय
मुळे यांनी सांगितले, कामगार विमा रुग्णालयात बालरोग विभाग नाही. यामुळे येथील रुग्णांना एका खासगी रुग्णालयात पाठविले जायचे. यासाठी करार करण्यात आला होता. मात्र दोन वर्षांपूर्वी हा करार संपुष्टात आल्याने बालरुग्ण अडचणीत आले आहेत. बालरुग्णांवर अन्याय होत आहे. दीड कोटींचे बिल एक वर्षापासून पडूननागपुरातील १२ सेवा दवाखान्यांसह (डिस्पेंसरी) अमरावती, अकोला, चंद्रपूर, हिंगणघाट येथील सेवा दवाखान्यातील कामगारांच्या औषधांचे दीड कोटी रुपयांचे बिल एक वर्षांपासून मुंबईचे मुख्य विमा योजनेचा कार्यालयात पडून आहे. परंतु कुणालाच याची काळजी नाही. याचा फटका रुग्णांना बसत असून त्यांना रुग्णालयाचा चकरा माराव्या लागत असल्याचे मुळे यांनी सांगितले. तारांकित प्रश्नानंतरही समस्या कायमच उपचारासाठी वेतनामधून पैसा कपात होऊनही उपचार मिळत नसल्याने रुग्णाचा संताप समोर येऊ लागला आहे. येथील डॉक्टर-रुग्णांच्या संबंधामध्ये कटुता आली आहे. ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या रुग्णालयाच्या समस्यांच्या वृत्ताबाबत राज्य पावसाळी विधीमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. याला घेऊन रुग्णालयाची पाहणी व समस्या जाणून घेण्यासाठी आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद व संचालक डॉ. राजीव स्वामी यांनी रुग्णालयाला भेट दिली. परंतु त्यानंतरही समस्या सुटलेल्या नाहीत, हे विशेष.