नागपूर : स्थानिक २० वर्षांचा आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू जयंत जयप्रकाश दुबळे याने ब्रिटनमधील उत्तर अटलांटिक महासागर व आयरिश समुद्रातील नॉर्थ चॅनल हे ४० किमी अंतर १४ तास ३९ मिनिटात यशस्वीरीत्या पोहून पूर्ण करीत नव्या विक्रमाला गवसणी घातली.
नॉर्थ चॅनल उत्तर आयर्लंड ते दक्षिण पश्चिम स्कॉटलंडला जोडते. अशी कामगिरी करणारा जयंतचा रिले संघ आशियातील पहिला संघ ठरला. मोहिमेदरम्यान १२ अंश सेल्सियस या अतिशय थंड वातावरणाचा आणि जेलीफिश तसेच समुद्री श्वापदांचा अडथळा जलतरणपटूंना पार करावा लागला.
विश्व खुल्या सागरी जलतरण संघटनेने निर्धारित केलेल्या सात सागरातील सर्वात कठीण 'नॉर्थ चॅनल' पोहणाऱ्या जयंतच्या रिले पथकात मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम, हरियाणा व तामिळनाडू येथील एकूण सहा जलतरणपटूंचा समावेश होता. जयंतच्या यशाबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जयंत हा फोर महाराष्ट्र नेव्हल एनसीसी युनिटचा कॅडेट असून ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनमध्ये शारीरिक शिक्षण पदवीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे.
जयंतची कामगिरी...
■ बंगालमधील जगातील सर्वात लांब ८१ किमी खाडी १२ तास २९ मिनिटात पोहून पूर्ण केली.
■ मुंबई- गोवा येथील १४० किलोमीटर अंतराचे सागरी जलतरण यशस्वीरीत्या पूर्ण केले.
■ भारत- श्रीलंका यांच्यातील पाल्कची सामुद्रधुनी ९ तास २० मिनिटात पूर्ण केली.
■ या विक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेण्यात झाली आहे.
'समुद्रातील बारा ते पंधरा अंश सेल्सिअस तापमानात थंड पाण्यात पोहणे त्यासोबतच अतिशय वेगाने वाहणारे थंड वारे, समुद्रातील जेलीफिशचा सामना करणे हे माझ्यासाठी अतिशय नवीन होते. दिवंगत आईचा आशीर्वाद आणि वडिलांच्या प्रेरणेमुळे मी यशस्वीपणे हा विक्रम करू शकलो, याचा मला आनंद होत आहे. या विक्रमामुळे युवा जलतरणपटूंना निश्चितच प्रेरणा मिळेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.'
- जयंत दुबळे, जलतरणपटू