लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: केंद्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार-२०१८ ची घोषणा करण्यात आली असून नागपूरची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कांचनमाला पांडे देशातील सर्वोत्कृष्ट दिव्यांग खेळाडू ठरली आहे. नाशिकचा स्वयं पाटील यास देशातील सर्वोत्कृष्ट सृजनशील बालकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यातील ६ व्यक्ती आणि ३ संस्थांना हा पुरस्कार जाहीर झाला असून राष्ट्रपतींच्या हस्ते ३ डिसेंबर या जागतिक अपंगदिनी पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे.केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्यावतीने जागतिक अपंगदिनानिमित्त देशातील दिव्यांगजन व्यक्तींसह दिव्यांगासाठी उत्कृष्ट कार्यकरणा-या संस्थांना राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार प्रदान करण्यात येतो. राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार-२०१८ साठी विविध १४ श्रेणींमध्ये देशातील एकूण ६९ व्यक्ती व संस्थांना यावर्षी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातील ६ व्यक्ती आणि ३ संस्थांचा यात समावेश आहे. ३ डिसेंबर २०१८ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते व केंद्रीय केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री थावरचंद गहलोत यांच्या उपस्थितीत विज्ञान भवन येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
कांचनमाला पांडेच्या ऐतिहासिक कामगिरीची दखलनागपूरच्या कांचनमाला पांडे हीने मेक्सिको येथे पार पडलेल्या पॅरा वर्ल्ड स्विमिंग चॅम्पियनशिप-२०१७ स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले होते व या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी कांचनमाला भारताची पहिली जलतरणपटू ठरली होती. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्यावर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात कांचनमालाचा सत्कार केला होता व १५ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्र शासनाने कांचनमाला ला जलतरण प्रशिक्षक म्हणून नोकरीही देवू केली आहे. आता क्रीडा क्षेत्रातील तिच्या योगदानाची दखल घेऊन तिला सर्वोत्कृष्ट महिला दिव्यांग क्रीडापटूचा राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार जाहीर झाला आहे.जन्मांध असणा-या कांचनमालाने हे जग बघितले नाही मात्र जगाला तिच्या कार्याचा हेवा वाटावा अशी तिची कामगिरी आहे. कांचनमाला ही मूळची अमरावतीची. अमरावती मध्यवर्ती कारागृहाशेजारील आनंद स्टेट बँक कॉलनीत तिचे वास्तव्य. कांचनमालाने येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण तलावात जलतरणाचे धडे गिरविले. सध्या ती नागपूर येथे रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या विभागीय कार्यालयात सहायक पदावर कार्यरत आहे.कांचनमालाने जवळपास १० हून अधिकवेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केल. अंधाच्या राष्ट्रीय जलतरण चॅम्पीयनशिपमध्ये तिने जवळपास १०० हून अधिक सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. कांचनमाला ही दहावी व बारावी मध्ये ७५ टक्केपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. तिने पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पदवी शिक्षण पूर्ण करीत असतानाच ती बँकींगची तयारी करीत होती. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या परिक्षेत ती उत्तीर्ण झाली व बँकेच्या नागपूर शाखेत गेल्या ३ वर्षांपासून सहायक पदावर कार्यरत आहे.