सूरभी शिरपूरकर
नागपूर : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर नागपुरातील काळी इडलीचीच(Black Idli) चर्चा होती. सर्व या इडलीबाबत उत्सूक होते. तर, आता तीच काळी इडली बनवणाऱ्या नागपूरच्या कुमार रेड्डी यांनी प्रजासत्ताक दिनी चक्क दीड फूट लांबीची आणि अडीच किलो वजन असलेली देशातील सगळ्यात मोठी इडली बनवलीये. ही तिरंगी इडली(Tricolour Idli) त्यांनी देशातील शूर सैनिकांसाठी डेडीकेट केलीय हे विशेष.
दक्षिण भारतीय पदार्थ सगळ्यांनाच आवडतात. डोसा, इडली, उत्तपम असे वेगवेगळे पदार्थाची चव देशभरातील लोकांच्या पसंतीचे ठरले आहेत. नागपूरच्या वोकर्स स्ट्रीटवर अण्णा कुमार रेड्डी यांचा फूड स्टॉल आहे. ज्यात १०० हून अधिक इडलीच्या व्हरायटीज मिळतात. रोज सकाळी त्यांचा स्टॉल उघडताच खवय्यांची गर्दी तेथे दिसून येते. त्यांनीही खवय्यांना अगदी खूश करत इडलीत नवनवीन प्रयोग सुरू केले. त्यांनी बनवलेल्या काळी इडलीने इंटरनेटवर आपली छाप सोडली होती. तर, आता त्यापुढे जात कुमार अण्णांनी चक्क देशातील सर्वात मोठी इडली बनवली. दीड फूट लांब आणि चक्क अडीच किलो वजनाची ही इडली पाहताच अनेकांनी तोंटात बोटचं टाकली. महत्वाचं म्हणजे ही इडली तीन रंगांची म्हणजे ट्रायकलर आहे.
ही ट्राय कलर इडली ही दिसायला जितकी भारी आहे तितकीच खायलादेखील पौष्टिक आहे. वटाणा, पालक याने हिरव्या रंगाचं बॅटर तयार केलयं. तर गाजर, बीटरुट अशा अनेक पौष्टीक भाज्यांनी लाल रंगाचे बॅटर तयार करण्यात आले आहे. या बाहुबलीस्वरुपी इडलीचे स्टफिंगसुद्धा अनेक पौष्टिक भाज्या आणि फुल्ल ऑफ चीझने करण्यात आले. तर, देशासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या शूर सैनिकांसाठी २६ जानेवारी, १५ ऑगस्ट आणि १४ फेब्रुवारीला ही इडली अगदी हाफ प्राइजमध्ये म्हणजे अर्ध्या किमतीत मिळेल.
तर, वेगवेगळ्या रंगांनी बहरलेली ही संत्रानगरी तर्री पोह्यांसाठीच नव्हे तर इडलीसाठीही चांगलीच फेमस झालीय. नागपूरकरांना जवळपास १०० प्रकारच्या इडलींचा आस्वाद इथे घेता येतो. मग तुम्ही कधी येताय इथली फेमस इडली खायला.