लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्राईम ब्रँचने कुख्यात महिला डॉन चंदा ठाकूर हिला मद्याची तस्करी करताना रंगेहात पकडले आहे. ती आपल्या अड्ड्यावरून दारूच्या पेटीची विक्री करीत होती. मात्र कारवाईदरम्यान पोलिसांना चकमा देऊन ती पसार झाली. तिच्या अड्ड्यावरून २ लाख रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे.चंदा ठाकूर मागील अनेक दिवसांपासून लेडी डॉन म्हणून परिचित आहे. तिच्या विरोधात हप्तावसुलीसह अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. आपल्या नातेवाईकांच्या मदतीने ती मादक पदार्थांचीही तस्करी करते. यामुळे तिला पकडणे बरेच कठीण झाले होते. लॉकडाऊन झाल्यापासून तिचा दारूचा व्यवसाय जोमात सुरू होता. ती कळमना येथील शिवशक्ती नगरात राहत असली तरी तिचा अड्डा इतवारी स्टेशनजवळील शांतिनगर मार्गावर आहे. एक-दोन किरकोळ बाटल्या विकण्याऐवजी ती थेट बॉक्स विकायची. त्यामुळे रोज तिच्याकडे मोठ्या संख्येने लहानमोठे ग्राहक येत असत. मंगळवारी सकाळी तिच्या अड्ड्यावर दारूच्या ४० पेट्या पोहचल्या. क्राईम ब्रँचला ही माहितीमिळाल्याने मंगळवारी रात्री त्यांनी धाड घातली. तिने घराजवळीलच एका गोदामात दारू लपवून ठेवली होती. पोलिसांनी तेथून १३ पेट्या जप्त केल्या. त्याची किंमत दोन लाख असल्याचे सांगण्यात येते. या कारवाईची माहिती मिळताच चंदा पसार झाली. जप्त करण्यात आलेली दारू मध्य प्रदेशातून आणलेली आहे. लॉकडाऊन झाल्यापासून तिच्या अड्ड्यावर नियमितपणे मद्याचा साठा पुरविला जायचा. लॉकडाऊनच्या काळात राज्याच्या सीमा सील आहेत. अशाही परिस्थितीत राज्याची सीमा ओलांडून दारू आणणे सोपे नाही. त्यामुळे हा दारूचा साठा कसा पोहचला हे शोधणे पोलिसांपुढील आवाहन आहे. चंदा ठाकूर ही अट्टल गुन्हेगार आहे. असे असतानाही शांतिनगर पोलिसांनी तिची निगराणी केली नाही. ती पोलिसांच्या हातात लागल्यावरच सत्य पुढे येणार आहे. ही कारवाई डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनोद चौधरी, मस्के, एपीआय योगेश चौधरी, एएसआय रफीक, हवालदार अन्नू ठाकूर, प्रशांत लांडे, रामकृष्ण, राजू पोद्दार, नायक श्याम कडू, प्रवीण गोरटे तसेच सैयद यांनी केली.
मद्य तस्करीत अडकली नागपूरची लेडी डॉन चंदा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 10:21 PM
क्राईम ब्रँचने कुख्यात महिला डॉन चंदा ठाकूर हिला मद्याची तस्करी करताना रंगेहात पकडले आहे. ती आपल्या अड्ड्यावरून दारूच्या पेटीची विक्री करीत होती. मात्र कारवाईदरम्यान पोलिसांना चकमा देऊन ती पसार झाली.
ठळक मुद्देदोन लाखाचा माल जप्त : क्राईम ब्रँचने केली कारवाई