आॅनलाईन लोकमतनागपूर : महामेट्रो व्यवस्थापनातर्फे कंत्राटदारांना बांधकामादरम्यान कठोर सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे निर्देश वारंवार दिल्यानंतरही कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा पुन्हा बुधवारी रात्री दिसून आला. बांधकामस्थळी ट्रेलरमध्ये नेण्यात येणारा लोखंडी पिलरचा मोठा ढाचा भंडारा मार्गावरील एचबी टाऊनजवळ रात्री ११ च्या सुमारास रस्त्यावर पडला.या घटनेदरम्यान ट्रेलरच्या मागून येणारा एक दुचाकीचालक थोड्या अंतरावर थांबल्यामुळे बचावला.प्राप्त माहितीनुसार, ट्रेलर क्र. एमएच-०६-एजी-७९९२ मध्ये एचबी टाऊन परिसरातून छापरूनगरकडील मेट्रोच्या बांधकामस्थळी लोखंडी पिलरचा ढाचा नेण्यात येत होता. अचानक मोठा आवाज झाला आणि ढाचा रस्त्याच्या मध्यभागी पडला. रात्रीची वेळ असल्यामुळे मार्गावर वर्दळ नव्हती. त्यामुळे जीवितहानी झाली नाही.घटनेनंतर ट्रेलरचे संतुलन बिघडले; पण ड्रायव्हरने ट्रेलर पुढे नेऊन उभा केला. घटनास्थळी नागरिकांची गर्दी होऊ लागताच ड्रायव्हरने ट्रेलर सोडून पळ काढला. मोठा लोखंडी ढाचा नेत असताना कुठलीही सुरक्षा व्यवस्था नसल्याबद्दल नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यात सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी यावेळी दिला.
नागपुरात मेट्रो पिलरचा लोखंडी ढाचा ट्रेलरमधून रस्त्यावर पडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:12 PM
बांधकामस्थळी ट्रेलरमध्ये नेण्यात येणारा लोखंडी पिलरचा मोठा ढाचा भंडारा मार्गावरील एचबी टाऊनजवळ रात्री ११ च्या सुमारास रस्त्यावर पडला.
ठळक मुद्देदुचाकीचालक बचावला कुठलीही सुरक्षा व्यवस्था नाही