लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील हवेची दिशा बदलताच पुन्हा तापमानाचा पारा चढायला लागला आहे. मागील २४ तासात किमान तापमान २०९ अंश सेल्सिअसने वाढून १,४०९ अंशावर पोहचले. रविवारी दक्षिण-पश्चिम दिशेने ७.५ किलोमीटरच्या वेगाने वारा वाहात होता. येत्या दोन दिवसात अवकाशात ढग दाटण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतामध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. असे असले तरी नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये यंदा अधिक थंडीचा परिणाम जाणवलेला नाही. डिसेंबर महिन्यात एकदाच पारा ८.४ अंशापर्यंत उतरला होता. यंदाच्या वर्षातील तो सर्वात कमी थंडीचा दिवस ठरला; मात्र जानेवारी महिन्यात अद्यापपावेतो एकल आकड्यात पारा आलेला नाही.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर ते दक्षिण दिशेकडे यंदा हवेची दिशा झालेली नाही. त्यामुळेच पारा खालावलेला नाही. रविवारी नागपुरात सकाळी ८.३० वाजता आर्द्रता वाढून ७५ टक्क्यांवर पोहोचली.
मात्र दिवसभर कडक उन्ह पडल्याने पारा सामान्यापेक्षा तीन अंशांनी वर ३३.२ अंश नोंदविण्यात आला. दिवसभर वारा वाहात होता. सायंकाळी ५.३० वाजता आर्द्रता खालावून ४७ टक्क्यांवर पोहोचली.