लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्याच्या शेतात घेण्यात आलेले अवैध वीज कनेक्शन पकडल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजार रुपयाची लाच मागणाऱ्या महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ अटक केली. प्रदीप सुदामा शर्मा (३१) रा. धंतोली काटोल, कनिष्ठ अभियंता, महावितरण कंपनी, काटोल ग्रामीण - २ व रवींद्र रामचंद्र बोढाळे (५९) वरिष्ठ तंत्रज्ञ, महावितरण कंपनी, काटोल, अशी आरोपींची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद जमील मोहम्मद इकबाल (३९) यांनी शेतात पाणी देण्यासाठी अवैध वीज कनेक्शन घेतले होते. याप्रकरणी त्यांच्यावर दाखल करण्यात येणारा गुन्हा टाळण्यासाठी उपरोक्त आरोपींनी २५ हजार रुपयाची मागणी केली होती. इकबाल यांनी यासंदर्भात लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. दरम्यानच्या काळात रवींद्र बोढाळे यांनी तडजोड करीत प्रकरण १० हजार रुपये देण्याची मागणी इकबाल यांना केली. यावर लाचलुचपत विभागाने सापळा रचून काटोल येथील हर्ष पान पॅलेस येथे रवींद्र बोढाळे यांना इकबाल यांच्याकडून १० हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७, ७(अ)नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. उपरोक्त कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक फाल्गुन घोडमारे यांच्या पथकाने केली.
नागपुरात महावितरणचा अभियंता व तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 10:42 AM
शेतकऱ्याच्या शेतात घेण्यात आलेले अवैध वीज कनेक्शन पकडल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजार रुपयाची लाच मागणाऱ्या महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ अटक केली.
ठळक मुद्देगुन्हा दाखल न करण्यासाठी मागितले पैसे