लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - तरुणीवर हल्ला करून मोबाईल हिसकावून नेणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला नंदनवन पोलिसांनी जेरबंद केले. भोपाळ (मध्यप्रदेश)मध्ये या टोळीची खबर मिळाल्यावरून पोलिसांनी तेथे जाऊन आरोपींच्या मुसक्या बांधल्या. भय्यू ऊर्फ जावेद खान नवाब खान (वय २७, रा. मांजीनगर, बैरागड भोपाळ), आसिफ अली इम्तियाज अली (२१, रा. कळमना) आणि कुणाल सुरेश गायकवाड (१८, रा. दुर्गानगर पारडी) तसेच प्रवीण ऊर्फ अनूप सत्यनारायण साहू (२०, रा. कळमना) अशी या टोळीतील गुंडांची नावे आहेत. त्यातील प्रवीण साहू सध्या कारागृहात बंद आहे.
आरोपी प्रवीण, आसिफ आणि कुणाल हे सराईत गुन्हेगार आहेत. या तिघांनी ऑक्टोबर २०२० मध्ये एका तरुणावर प्राणघातक हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले होते. तो गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस मागावर असल्यामुळे त्यांनी आपले लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून स्वत:चे मोबाईल स्वीच ऑफ केले. संपर्कासाठी त्यांनी मोबाईल हवा म्हणून त्यांनी पुन्हा एक गुन्हा केला.
१६ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजता ज्योती बागडी (हिवरीनगर) औषधाचे पार्सल घेऊन पायी जात असताना यांच्यावर हल्ला करून त्यांचा मोबाईल हिसकावून नेला. येथून ते भोपाळला गेले. पोलीस या गुन्ह्याचा तपास करत असताना ज्योती यांच्या मोबाईलचे लोकेशन भोपाळला दिसल्याने नंदनवन पोलिसांच्या पथकाने तेथे जाऊन हा मोबाईल वापरणारा आरोपी जावेद ऊर्फ भय्यू खानला ताब्यात घेतले. त्याने हा मोबाईल त्याचा साळा आरोपी आसिफने दिल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी आरोपी आसिफ आणि त्याच्या माहितीवरून कुणालला अटक केली. त्यांचा एक साथीदार साहू कारागृहात असून पोलीस त्यालाही लवकरच ताब्यात घेणार आहेत.
क्राईम रेकॉर्डचा तपास
या गुन्ह्यातील मोबाईल वापरल्यामुळे पोलिसांच्या हाती लागलेल्या भय्यू खानचा भोपाळमधील क्राईम रेकॉर्ड पोलीस तपासत आहेत. आपल्या साळ्याच्या मदतीने त्याने इकडे काही गुन्हे केले का, त्याचीही पोलीस चाैकशी करत आहेत. पोलीस उपायुक्त अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, नंदनवनचे ठाणेदार सांदीपान पवार, हवलदार संजय साहू, नायक संदीप गवळी, भीमराव ठोंबरे, शिपायी विनोद झिंगरे आणि सायबर सेलचेदीपक तऱ्हेकर तसेच मिथून नाईक यांनी ही कामगिरी बजावली.
झारखंडच्या टोळीचाही छडा
नंदनवन पोलिसांनीच झारखंडच्या मोबाईल चोरट्यांचाही छडा लावला. यातील मुकेश रामचंद्र महतो (वय ३०, रा. महाराजपूर, झारखंड) याला अटक केली असून, त्याच्या दोन फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
या टोळीने हसनबागमधील जगदीश बेंडे यांचा मोबाईल वाठोड्याच्या भाजी बाजारातून २ जानेवारीला चोरला. पोलिसांनी वेगाने तपास करून आरोपी मुकेशला अटक केली. पोलीस मागे लागल्याचे लक्षात येताच त्याचे दोन साथीदार मात्र पळून गेले. या टोळीने नागपूर, अकोला, मूर्तीजापूरसह विविध शहरात मोबाईल चोरी केल्याचा संशय आहे.