नागपूर : कुख्यात गुंड सुमित ठाकूरला त्याची गर्लफ्रेंड मिस इंडिया उर्वशी साखरेच्या घरातून अटक करण्यात आली आहे. सुमित पिन्नू पांडेवरील गोळीबाराच्या प्रकरणात सव्वा महिन्यापासून पोलिसांना हवा होता. शुक्रवारी (3ऑगस्ट) सायंकाळी पोलिसांनी उर्वशीच्या जाफरनगर येथील घरावर छापा टाकून सुमितला अटक केली. सुमितने साथीदारांच्या मदतीने 26 जूनला दुपारी गिट्टीखदान ठाण्यांतर्गत पोलीस मुख्यालयाजवळील अवस्थीनगर चौकाजवळ पिन्नू पांडेवर गोळीबार केला होता.
या घटनेत पिन्नू पांडे गंभीर जखमी झाला होता. या घटनेत रस्त्यावरून जाणारा नागरिक आणि अल्पवयीन जखमी झाले होते. पोलिसांनी सुमितच्या गुर्गे उजैर ऊर्फ उर्जी क्राईम आणि पीयूष वानखेडेला अटक केली होती. सुमित आणि त्याचे इतर साथीदार पोलिसांच्या हाती लागत नव्हते. या प्रकरणात पोलिसांची फजिती होत होती. सुमितची काही काळापासून मिस इंडिया २०१८ उर्वशी साखरे हिच्याशी मैत्री आहे.
पोलिसांना सुमित उर्वशीला भेटायला आल्याची माहिती मिळाली. पोलीस उर्वशीवर काही दिवसांपासून पाळत ठेवून होते. सूत्रांनुसार गुरुवारी सायंकाळी सुमित उर्वशीच्या घरी आला. घराच्या पहिल्या माळ्यावर उर्वशीची बेडरुम आहे. खाली आईवडील राहतात. पोलिसांना सुमित उर्वशीच्या बेडरुममध्ये असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी शुक्रवारी महिला अधिकाऱ्यांच्या मदतीने योजना आखून उर्वशीच्या घरावर छापा टाकला. पोलीस थेट उर्वशीच्या बेडरुममध्ये पोहोचले. त्यांनी उर्वशीच्या घराला आधीपासून घेराव घातला होता. दरवाजा वाजल्यानंतर उर्वशीने दार उघडले. बेडरुमची तपासणी केली असता एका आलमारीत सुमित लपल्याचे पोलिसांना दिसले. उर्वशीने तो शुक्रवारी रात्री भेटण्यासाठी आल्याची कबुली दिली. पोलिसांनी सुमितला अटक करून गुन्हे शाखेत आणले.
प्राथमिक चौकशीत त्याने पिन्नू पांडेवर गोळीबाराच्या घटनेत समावेश असल्याचा इन्कार केला. सूत्रांनुसार सुमितची दीड वर्षांपासून उर्वशीसोबत मैत्री आहे. एप्रिल महिन्यात मिस इंडिया झाल्यानंतर उर्वशी रात्रभरात प्रसिद्धीच्या झोतात आली. सुमितची शहरातील गुन्हेगारी जगतात दहशत आहे. काही काळापूर्वी नेत्यांचेही त्याला संरक्षण मिळाले होते. सुमित आणि त्याच्या कुटुंबीयांना मकोकात जमानत मिळालेली आहे. या प्रकरणातून त्यांनी जमानतीच्या अटीचेही उल्लंघन केले आहे. यामुळे पोलीस त्यांची जमानत रद्द करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध कारवाई करून त्यांना वर्धा येथे सोडले होते.
ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आंचल मुदगल, राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, ज्ञानेश्वर बेदोडकर, उपनिरीक्षक दत्ता पेंडकर, आरजकुमार त्रिपाठी, मंगला मोकासे, हवालदार प्रकाश वानखेडे, रवींद्र गावंडे, प्रशांत देशमुख, शैलेश ठवरे, शत्रुघ्न कडु, विजय लेकुरवाळे, निनाजी तायडे, महेश कुलसंगे, गंजीत सिंह, सतीश पांडे, संतोष निखार, शाम कडु, सैय्यद वाहिद, श्याम गोरले, योगेश गुप्ता, अश्वीन पिल्लेवान यांनी पार पाडली.नेहमीच चर्चेत होत्या गर्लफ्रेंडसुमितची गर्लफ्रेंड नेहमीच चर्चेत राहिली आहे. पूर्वी बजेरीयाच्या एका तरुणीसोबत त्याची मैत्री होती. त्यानंतर एका दुसºया तरुणीसोबत त्याची मैत्री होती. ही तरुणी बजाजनगरात राहत होती. यावेळी घर मालकाला फ्लॅट खाली करून घेण्यासाठी खूप धडपड करावी लागली होती.