नागपूर - बुद्धिमत्तेच्या जोरावर अडथळ्यांची शर्यत पार पाडून थेट पोलीस उपनिरीक्षक बनलेल्या एका तरुणीने आता कोण बनेंगा करोडपतीचा सेट गाठला आहे. नुसता सेटच गाठला नसून हॉट सीटही मिळविली आहे. मंगला हरडे असे या महिला उपनिरीक्षकेचे नाव असून, त्या येथील गुन्हे शाखेत कार्यरत आहेत.
अनेकांचे करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा ‘कोण बनेंगा करोडपती’ हा टीव्ही शो हिंदीपाठोपाठ मराठीतही कमालीचा लोकप्रिय ठरला आहे. एकदा तरी या शोमध्ये हॉट सीटवर बसायला मिळावे, असे स्वप्न करोडो बुद्धिजीवी रोज बघतात. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत असलेल्या मंगला हरडे यासुद्धा गेल्या दोन वर्षांपासून हे स्वप्न रंगवीत होत्या. कर्तव्य आटोपून त्या न चुकता मराठीतील शो बघायच्या आणि करोडपतीच्या सेटवर पोहचण्यासाठी प्रयत्नही करायच्या. सहा महिन्यापूर्वी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यांना करोडपतीच्या टीमकडून पहिल्या फेरीचे प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर तीन महिन्यापूर्वी त्यांना सर्वात कमी वेळेत प्रश्नांची उत्तरे देण्याची फेरी पार पाडावी लागली. नंतर २४ जुलैला त्यांची हॉट सीटसाठी निवड झाल्याचे त्यांना कळविण्यात आले.
---
कॉन्स्टेबल बहिणीच्या मॉरलने गाठला टप्पा
करोडपतींचा सेट फिल्मसिटी गोरेगावमध्ये असून, २७ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान मंगला यांनी हॉट सीटवर बसून अभिनेता सचिन खेडेकर यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांची कीर्ती नामक बहीण त्यांच्यासोबत होती. कीर्ती या नागपूर् शहर पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांना वडील नसून त्यांच्या आई गृहिणी आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनामुळे आणि आई तसेच बहिणीकडून मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळेच आपण हे यश मिळविल्याचे त्यांनी सांगितले.
---