कचरा संकलन एजन्सींची मनमानी, नागरिकांना जागरूक करण्यात अपयश
लोकमत न्यूज नेटवर्क
राजीव सिंह
नागपूर : घरातून सुका आणि ओला कचरा वेगवेगळा संकलित करण्यात प्रयत्न करूनही नियुक्त कंपन्यांना अपयश आले आहे. याचा परिणाम स्वच्छता सर्वेक्षण २०२१ मध्ये नागपूरच्या रॅकिंगवर होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना जनजागृतीसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. शहरात दररोज संकलित होणाऱ्या १ हजार मेट्रिक टन कचऱ्यापैकी २० टक्के म्हणजेच २०० मेट्रिक टन कचरा वेगवेगळा संकलित केला जात आहे. यात १५०टन ओला तर ५० टन सुक्या कचऱ्याचा समावेश आहे.
मनपाच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार १६ नोव्हेंबर २०१९ ला शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी दोन एजन्सीकडे देण्यात आली. यात झोन १ ते ५ ची जबाबदारी ए.जी. एन्व्हायरो तर झोन ६ ते १० ची जबाबदारी बीव्हीजी कंपनीकडे देण्यात आली. वर्ष उलटले तरी या कंपन्यांना ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्यात यश आलेले नाही.
कचरा संकलन गाड्यात ओला आणि सुका कचरा संकलित करण्यासाठी दोन वेगवेगळे कम्पार्टमेंट बनविण्यात आले आहे. परंतु नागरिकांना जागृत करण्यात कर्मचाऱ्यांना यश आलेले नाही.
एजी एन्व्हायरो कंपनीने लॉकडाऊन कालावधीत १२३ कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवून कमी केले. आता अनलॉकमुळे कर्मचाऱ्यांची मागणी वाढली आहे. घरापर्यंत कचरा संकलन कर्मचारी दररोज पोहचत नाही. बीव्हीजी कंपनीनेही ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्याबाबत तत्परता दर्शविलेली नाही.
आयुक्त व अपर आयुक्त स्तरावर ११ महिन्यात एजी एन्व्हायरो कंपनीला ४४ लाख ९१ हजार ९१४ रुपयाचा दंड केला. तर झोनल आफिसर स्तरावर ९ लाख ६८ हजार २८३ रुपये दंड आकारण्यात आला. तर बीव्हीजी कंपनीला अधिकारी स्तरावर ५ लाख तर झोनल आधिकारी स्तरावर ११ लाख ८८ हजार ९८ रुपये दंड आकारण्यात आला.
.