लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीताबर्डीच्या राजाराम दीक्षित वाचनालयाचे सचिव व भारतीय रिझर्व्ह बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी मुकुंद नानिवडेकर यांचे मंगळवारी उशिरा रात्री निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या ५० वर्षांपेक्षा अधिक काळापासून राजाराम वाचनालयाशी जुळलेल्या नानिवडेकर यांनी वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आयुष्य वेचले. त्यामुळे त्यांच्या निधनाने वाचन चळवळीचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.लहानपणापासून जनार्दन स्वामींचे शिष्य असलेल्या मुकुंद यांना त्यावेळी संन्यास घ्यावा, अशी तीव्र इच्छा होती. वैराग्याच्या आयुष्याकडे न जाता आयुष्यभर अविवाहित राहून सार्वजनिक जीवनातच एखाद्या संन्यासाप्रमाणे आयुष्य त्यांनी घालविले. लायब्ररी सायन्समध्ये एम.ए. केल्यानंतर त्यांचा ग्रंथालयाशी संबंध आला तो कायमचा. त्यावेळी ते राजाराम वाचनालयाशी जुळले गेले व शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ही धुरा सांभाळली. लोकमान्य टिळकांचे पदस्पर्श लाभलेले १०० वर्षांपेक्षा अधिक जुने हे वाचनालय. त्यामुळे त्यांना मिळालेल्या जबाबदारीचे महत्त्व मोठे होते. त्यावेळी आर्थिक आघाडीवर वाचनालयाची अवस्था बिकट होती. अशावेळी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने वेगवेगळे प्रयोग त्यांनी सुरू केले. वाचनालयात सशुल्क मार्गदर्शन वर्ग सुरू केले, ज्यामुळे लायब्ररीच्या फंडात पैसा गोळा झाला. त्यावेळी तेथे फेरीवाल्यांचे अतिक्रमण होते. त्यांच्याशी संघर्ष करून वाचनालयाची न्याय्य जागा प्राप्त केली. सहकार्याने तेथे संकुल उभारले व वेगवेगळ्या प्रतिष्ठानाला भाड्याने जागा दिली. यामुळे वाचनालयासाठी आर्थिक आधार उभा झाला.यावेळी त्यांची वाचन चळवळही सुरू होती. तालुका व ग्रामस्तरावर पुस्तकांचे प्रदर्शन भरवून शालेय विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकाची गोडी लावण्याचे काम निष्ठेने केले. लहान मुलांसाठी वाचनाशी संबंधित स्पर्धा व वेगवेगळे उपक्रम राबविण्यात त्यांना प्रचंड उत्साह होता. त्यांचा प्रत्येक रविवार या कामातच जायचा. बँकेतील नोकरीचा वेळ वगळता त्यांचा पूर्णवेळ वाचन संस्कृतीच्या प्रचार-प्रसारातच गेला. ‘वाचाल तर वाचाल’ हे त्यांचे ब्रीद वाक्य. महाराष्ट्रातील क्रमांक २ ची ग्रंथसंपदा या वाचनालयात असल्याने बरेच दुर्मिळ ग्रंथ येथे आहेत. त्यांचे जतन करण्यासाठी त्यांनी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली. जुनी पुस्तके जतन करण्यासह नवीन पुस्तके खरेदी करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे नानिवडेकर एक माहितीकोश झाले होते. पीएचडी करणारे अनेकजण त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे. त्यांच्या प्रयत्नाने २०१६ साली वाचनालयात बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले व साहित्य संस्कृती मंडळाने त्यासाठी अनुदानही दिले. पराकोटीची ज्येष्ठता लाभलेले मुकुंद नानिवडेकर आयुष्यभर सात्विक आणि नम्रपणे जगले.
नागपूरच्या वाचन चळवळीचा आधारवड हरपला : मुकुंद नानिवडेकर अनंतात विलीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:56 AM
सीताबर्डीच्या राजाराम दीक्षित वाचनालयाचे सचिव व भारतीय रिझर्व्ह बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी मुकुंद नानिवडेकर यांचे मंगळवारी उशिरा रात्री निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या ५० वर्षांपेक्षा अधिक काळापासून राजाराम वाचनालयाशी जुळलेल्या नानिवडेकर यांनी वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आयुष्य वेचले. त्यामुळे त्यांच्या निधनाने वाचन चळवळीचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
ठळक मुद्देराजाराम वाचनालयाद्वारे मुलांना प्रेरणा