लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घराशेजारी राहणाऱ्या शेजाऱ्यालाही आजकाल मदत करण्यासाठी अनेक जण मागे-पुढे पाहतात. सुटीच्या दिवशी कार्यालयातील सहकाऱ्याच्या कुटुंबातील कुणी मृत झाल्यास अंत्येष्टीसाठी जायलाही मागे-पुढे पाहणारे अनेक महाभाग आहेत. परंतु आपल्यासोबत काम करणाऱ्या आरपीएफ जवानाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी अवघ्या तीन तासात ८० हजार रुपये स्वेच्छेने जमा करून रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे.रेल्वे सुरक्षा दलाच्या अजनी ठाण्यात महेंद्रसिंग मीणा (२७) हा जवान कार्यरत होता. रविवारी शंटिंगच्या कामादरम्यान या जवानाला रेल्वेगाडीची जोरदार धडक बसून तो जागीच ठार झाला. ठार झालेल्या जवानाची घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. त्याला पाच भाऊ आणि सहा बहिणी आहेत. तोच घरातील एकमेव कमावता व्यक्ती होता. ही बाब आरपीएफच्या जवानांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे सर्व जवानांनी त्याच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. अवघ्या तीन तासात ८० हजार रुपये गोळा झाले. तर रेल्वे सुरक्षा दलाच्या नागपूर ठाण्यातील उपनिरीक्षक होती लाल मीणा यांनी आपल्या वेतनातील ११ हजार रुपये मृत जवानाच्या कुटुंबीयांसाठी दिले. ही रक्कम घेऊन एक उपनिरीक्षक आणि चार आरपीएफ जवान सोबत देऊन या जवानाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी रवाना करण्यात आला. याप्रसंगी आरपीएफ जवानांनी आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूनंतर दाखविलेली औदार्याची भावना खरोखरच समाजासमोर आदर्श प्रस्थापित करणारी आहे.आणखी मदत करणार : ज्योती कुमार सतीजामृत आरपीएफ जवान महेंद्रसिंग मीणा यांच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्यामुळे आम्ही घाईगडबडीत ८० हजाराची मदत गोळा करू शकलो. मृत जवानाच्या कुटुंबीयांना आणखी मदत करण्याचे आम्ही ठरविले आहे. लवकरच एक मोठी रक्कम गोळा करून या कुटुंबाच्या मदतीत खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.