नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या हल्ला प्रकरणात नागपुरातील गणेशपेठ आगारातील यांत्रिक कर्मचारी संदीप गोडबोले यास अटक करण्यात आली आहे.
सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण नागपूरपर्यंत पोहोचले आहे. मुंबई पोलिसांनी बुधवारी एसटी महामंडळाच्या गणेशपेठ आगारातील यांत्रिक कर्मचारी संदीप गोडबोले यास नागपुरातून अटक करून मुंबईला नेले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे नेते ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींमध्ये संदीप गोडबोले याचे नाव पुढे आले होते. मुंबई पोलिसांनी सदावर्तेचे कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले असता संदीप गोडबोले याने घटनेच्या दिवशी त्यांना व्हॉट्सअप कॉल केल्याची माहिती मुंबई पोलिसांना तपासादरम्यान मिळाली होती.
संदीप गोडबोले हा गणेशपेठ आगारात यांत्रिक कर्मचारी आहे. संपात सहभागी झाल्यामुळे त्याच्याविरुद्ध एसटी प्रशासनाने बडतर्फीची कारवाई केली होती. घटनेच्या दिवशी तो सदावर्तेच्या संपर्कात असल्याचे सिद्ध झाल्यामुळे मुंबई पोलिसांनी नागपुरात येऊन त्यास अटक केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याला दुजोरा दिला आहे. मुंबई पोलिसांचे एक पथक नागपूरला आले होते. त्यांनी नागपूर पोलिसांच्या मदतीने संदीप गोडबोलेला ताब्यात घेतले आहे. नागपुरातील आणखी काही संपकरी कर्मचारी सदावर्तेच्या संपर्कात होते का, याचाही पोलीस शोध घेत आहेत. याबाबत एसटीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता मुंबई पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला नसल्याचे त्यांनी सांगितले.
...........