आॅनलाईन लोकमतनागपूर : ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. वि. स. जोग यांना विदर्भ साहित्य संघातर्फे दिला जाणारा ‘जीवनव्रती’ पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसिद्ध कादंबरीकार विदर्भ साहित्य संघाचे पूर्वाध्यक्ष ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. यंदा या पुरस्कारासाठी डॉ. वि. स. जोग यांची निवड करण्यात आली असून २५ हजार रोख, शाल-श्रीफळ व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर व कार्यालय चिटणीस प्रकाश एदलाबादकर यांनी डॉ. जोग यांंच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. याआधी या पुरस्काराने कवी ग्रेस, प्रा. महेश एलकुंचवार, सुरेश भट, राम शेवाळकर यांना गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळविणारे डॉ. जोग हे दहावे साहित्यिक आहेत. १४ जानेवारी २०१८ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिनी त्यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.