लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीतील एक महत्त्वाचा दिवस मानण्यात येणाऱ्या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शहरातील सराफा बाजारात प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. दिवसभर शहरातील दागिन्यांच्या दुकानांमध्ये गर्दी दिसून आली. शहरात सोन्या-चांदीची कोट्यवधींची उलाढाल झाली. अनेक दुकानांमध्ये तर पाय ठेवायलादेखील जागा नव्हती. सोन्याचा भाव ३२ हजार ७०० रुपये असतानादेखील ग्राहकांच्या गर्दीमुळे सोन्याला झळाळीच मिळाल्याचे चित्र होते.यंदा दिवाळी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आली आहे. पहिल्याच आठवड्यात पगार व बोनस मिळाल्याने ग्राहकांची बाजारात गर्दी दिसून आली. व्यापाऱ्यांनीदेखील ग्राहकांची पसंती जपण्याचा पूर्ण प्रयत्न केला. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने व चांदीला मोठ्या प्रमाणात मागणी होती. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा बाजारात मंगळसूत्र व चेन यांना जास्त मागणी होती. महाल, इतवारीतील काही दुकानांत तर ग्राहकांना रांगा लावाव्या लागल्या. ग्राहकांची होणारी गर्दी लक्षात घेता, दागिन्यांची दुकाने सकाळी ९ च्या सुमारासच उघडली व रात्री उशिरापर्यंत खरेदी-विक्री सुरूच होती.शहरात सोमवारी सोन्याचा भाव ३२ हजार ७०० रुपये (प्रति १० ग्रॅम) तर चांदीचा भाव ३९ हजार रुपये किलो इतका होता. ग्राहकांचा भर दागिन्यांवर जास्त होता. दागिन्यांचा उपयोगदेखील होतो व दिवाळीवर यांची खरेदी शुभ मानण्यात येते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. प्रतिमांचीदेखील मागणीग्राहक वास्तुशास्त्रानुसारदेखील खरेदीवर भर देताना दिसून आले. घरांमध्ये ठेवण्यासाठी ठोस मूर्ती व प्रतिमा याची मागणी होती. त्या हिशेबाने व्यापाऱ्यांनीदेखील तशी तयारी करून ठेवली होती. सोन्याच्या १ ते २ इंची मूर्ती मोठ्या प्रमाणात विकल्या गेल्या तर माता लक्ष्मी व कुबेर यांच्या चांदीच्या प्रतिमांची सर्वात जास्त विक्री झाली. १ हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत यांचा दर होता. सर्वात जास्त विक्री ही ५ ते १० हजार रुपयांच्या प्रतिमा व मूर्तींची झाली. तसेच सोन्या-चांदीच्या नाण्यांनादेखील चांगली मागणी होती, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.‘इलेक्ट्रॉनिक्स’च्या दुकानांमध्येदेखील गर्दीयंदाची दिवाळी विशेष ठरावी, अशी अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे बऱ्याच जणांनी ‘इलेक्ट्रॉनिक’ वस्तूंच्या खरेदीवरदेखील भर दिला. टीव्ही, फ्रीज, मोबाईल, लॅपटॉप, वॉशिंग मशीन, कॅमेरा, कॉम्प्युटर, होम थिएटर इत्यादी उपकरणांच्या खरेदीसाठी शोरुम्समध्ये गर्दी झाली होती. आकर्षक ‘फायनान्स स्कीम्स’ व ‘एक्सचेंज’ सुविधेमुळे ग्राहकांची पावले मोठ्या प्रमाणात दुकानांकडे वळली.वाहनांना विशेष मागणीसोमवारी वाहन बाजारातदेखील उत्साह दिसून आला. सायकल, दुचाकी, चारचाकी खरेदीसाठी सकाळपासूनच विविध ‘शोरुम्स’मध्ये गर्दी दिसून आली. एकाच दिवसात वाहन बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली व हजारांहून अधिक वाहनांची विक्री झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.भांडेबाजारदेखील चमकलाधनत्रयोदशीच्या दिवशी अनेक नागरिक भांड्यांचीदेखील खरेदी करतात. बाजारपेठांमधील भांड्याच्या दुकानांमध्ये पितळ, तांब्याची भांडी खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून आली. सोबतच विविध धातूंपासून बनलेल्या मूर्ती, प्रतिमा, थाळ्या, कलश, पाण्याची भांडी इत्यादींना मागणी होती. दिवाळीच्या निमित्ताने कपडा बाजारातदेखील उत्साह दिसून आला. खरेदीसाठी बाहेर निघालेल्यांपैकी अनेकांची पावले कपड्यांच्या बाजाराकडे वळल्याचे दिसून आले. विविध ठिकाणी असलेल्या ‘आॅफर्स’मुळे तर गर्दी आणखी वाढली होती.