लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तोतलाडोह धरणामधील ‘डेड स्टॉक’ पाणी हळूहळू कमी होत आहे. त्यावर नवेगाव खैरी येथे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १०० एमएलडीची घट झाली आहे. जवळपास ही १६ ते १७ टक्के घट आहे. अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने शहरातील जलकुं भांची पाणीपातळी घटल्याने नळाद्वारे होणाºया पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. पुरेसा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. दुसरीकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. मागणीच्या तुलनेत ७० टक्के टँकरची मागणी पूर्ण करणे शक्य होत आहे. पुढील काही दिवसात पाऊ स न आल्यास शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मार्च ते मे दरम्यान शहराला दररोज ७०० ते ७२५ एमएलडी पाणीपुरवठा होत होता. मात्र प्रकल्पातील मर्यादित जलसाठा, विस्कळीत वीजपुरवठा तसेच गोरेवाडा प्रकल्पात जलसाठा उपलब्ध नसल्याने जून महिन्याला सुुरुवात होताच शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. दररोज ६०० एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. पारा चढल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. मागणी व पुरवठा यात तफावत निर्माण झाल्याने शहरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.
मागणी करूनही टँकर नाहीनळाला दाबाने पाणी येत नसल्याने नॉननेटवर्क भागाप्रमाणेच नेटवर्क असलेल्या भागातही टँकरची मागणी वाढली आहे. परंतु जलकुंभांच्या पाणीपातळीत घट झाल्याने सध्या टँकरची मागणी ७० टक्के पूर्ण करणे शक्य होत आहे. परंतु नवेगाव खैरी प्रकल्पातून उपलब्ध होणाºया कच्च्या पाणीपुरवठ्यात दिवसेंदिवस घट होत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे मागणी करूनही टँकर उपलब्ध होणार नाही. यामुळे पर्यायी जलस्रोत उपलब्ध नसलेल्या नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागण्याची शक्यता आहे.
म्हणूनच झाला पाणीपुरवठा विस्कळीतनवेगाव खैरी केंद्रातून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यास वेळप्रसंगी गोरेवाडा तलावातून पाणीपुरवठा केला जात होता. परंतु गोरेवाडा तलाव कोरडा पडला आहे. त्यामुळे टंचाई काळात येथून पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
नियोजनाअभावी बिघडली परिस्थितीनवेगाव खैरी प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठ्याचे फेब्रुवारी-मार्च महिन्यात नियोजन करणे अपेक्षित होते. उलट मार्च ते मे या कालावधीत शहराला सर्वाधिक ७०० ते ७२५ एमएलडी पाणीपुरवठा करण्यात आला. वेळीच नियोजन करून ६०० एमएलडी पाणीपुरवठा केला असता तर १५ दिवस पुरेल इतके पाणी शिल्लक राहिले असते. अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली नसती.