नागपूर : कबाड्याने ८ दिवसांपूर्वी भंगारमध्ये विकत घेतलेल्या एका कारच्या डिक्कीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह विवस्त्रावस्थेत असल्याने आरोपींनी हत्या करून तो डिक्कीत लपविला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक संशय होता. डॉक्टरांनी रात्री दिलेल्या अहवालानुसार तो संशय खरा ठरला.
मोमिनपुऱ्यातील गार्डलाईन ते मेयो मार्गावर (रेल्वे पटरीजवळ) नाैशाद शहा कयूम शहा (वय २७) याचे ताज स्पेअर पार्ट नावाने दुकान आहे. तो भंगारात मोठमोठी वाहने विकत घेतो. सुटे भाग वेगळे केल्यानंतर वाहन कापून ते भंगारात विकतो.
नाैशादने आठ दिवसांपूर्वी नागपुरातीलच एका व्यक्तीकडून एक शेवरलेट कंपनीची कार (एमएच ३१- सीएम ०७४४) विकत घेतली. ती आठ दिवसांपासून त्याच्या गोदाम परिसरात पडून होती. तेथे ठेवण्यापूर्वी त्याने कारची पूर्ण आतून बाहेरून पाहणी केली होती. तीन दिवसांपासून कारमधून दुर्गंध सुटला. मात्र, मांजर किंवा उंदीर सडला असावा, असे समजून नाैशाद आणि त्याच्याकडे काम करणाऱ्यांनी दुर्लक्ष केले.
शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास नाैशाद आणि त्याची माणसं कारजवळ जाताच त्यांना डिक्कीतून तीव्र दुर्गंधी आली. त्यांनी कारची डिक्की उघडताच त्यात मृतदेह आढळला. ही माहिती त्यांनी तहसील पोलिसांना कळविली. त्यानंतर ठाणेदार तृप्ती सोनवणे आणि त्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने हेसुद्धा आपल्या सहकाऱ्यांसह पोहोचले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली. शरीरावर कोणतीही जखम नव्हती. मात्र, मृतदेह पुरता विवस्त्र असल्यामुळे आरोपींनी हत्या करून कारच्या डिक्कीत मृतदेह लपवला असावा, असा अंदाज पोलिसांनी बांधला.
डोक्यावर फटका मारून केली हत्या
पोलिसांनी मृत व्यक्ती कोण आणि त्याची हत्या कशी झाली, त्याचा छडा लावण्यासाठी दिवसभर प्रयत्न केले. मृताची ओळख पटली नाही. मात्र, रात्री डॉक्टरांनी वैद्यकीय अहवालात डोक्यावर लोखंडासारख्या जाड वस्तूचा जोरदार फटका मारल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे नमूद केले.
सीसीटीव्हीचा आधार
हत्येचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी डॉग स्कॉड, ठसेतज्ज्ञ बोलावून घेतले. त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले. त्याचा आधार घेऊन आरोपींचा छडा लावण्याचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती ठाणेदार तृप्ती सोनवणे यांनी दिली.
----