निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाघांची राजधानी म्हणून ओळख असलेल्या उपराजधानीत वाघासारख्याच दिसणाऱ्या नव्या पाहुण्याचे दर्शन घडले आहे. हा पाहुणा आहे चिमुकला फुलपाखरू. लास्कर म्हणजेच ‘नाखवा’ या फुलपाखराची नागपुरात पहिल्यांदाच नाेंद झाली आहे. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या गाेरेवाडा बायाेडायव्हर्सिटी पार्कमध्ये हा चिमुकला जीव आढळून आला आहे.
गाेरेवाडा बायाेपार्कमध्ये सर्वेक्षण करीत असताना इन्सेक्ट व पक्षी अभ्यासक शामली खळतकर, शीतल चौधरी, शुभम चापेकर व आदेश शेंडगे यांना प्रथमच लास्कर या फुलपाखराचे दर्शन घडले. या टीमने त्यानंतर सतत दाेन दिवस या भागात त्याच्या अस्तित्वाबाबत अभ्यास केला. गाेरेवाडा जैवविविधता पार्कमधील फुलपाखरांच्या जैवविविधतेवर अनेक प्रकाशने आलेली आहेत पण त्यात आतापर्यंत नाखवा फुलपाखराचा उल्लेख नसल्याचा दावा टीम सदस्य शुभम चापेकरने केला आहे. त्याचे काही छायाचित्र काढून सत्यता पडताळणीसाठी बाॅंबे नॅचरल हिस्ट्री साेसायटी, मुंबई येथे पाठवले. साेसायटीचे उपसंचालक डाॅ. राजू कसंबे यांनी नागपुरात पहिल्यांदा या फुलपाखराची नाेंद झाल्याच्या गाेष्टीवर शिक्कामाेर्तब केले. या टीमने गेल्याच महिन्यात ९० वर्षात पहिल्यांदा नागपुरात आढळलेल्या काॅमन बँडेड पिकाॅक (माेर) चा शाेध घेतला हाेता. गाेरेवाडा हे जैवविविधतेने समृद्ध आहे. या ठिकाणी ९० प्रजातींच्या फुलपाखरांचे अस्तित्व आहे. याशिवाय बिबट्या, निलगाय, सांभर आणि २०० पेक्षा जास्त प्रजातीचे प्राणी व पक्षी तसेच स्थलांतरित पक्ष्यांचेही प्राधान्याचे अधिवास आहे.
चंद्रपूर, गडचिराेलीतही नाेंद
या फुलपाखराच्या जातीचे वैज्ञानिक नाव पँटोपोरीया असे असून मराठीत त्याला नाखवा असे संबाेधले जाते. त्याच्या पंखावर वाघासारखे पट्टे असून दिसायला अतिशय सुंदर दिसताे. पंखावर काळ्या, पिवळ्या आणि गडद केसरी रंगाचे पट्टे आहेत. यापूर्वी कॉमन लास्कर या फुलपाखराची नाेंद विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिराेलीसह पश्चिम घाट व ईशान्य भारतात झाली असल्याचे शुभमने सांगितले. एफडीसीएमच्या आरएफओ कल्पना चिंचखेडे यांनीही या फुलपाखराचे नागपुरात प्रथमच दर्शन झाल्याची बाब स्वीकारली आहे.
नागपूर शहरात नवीन व दुर्मिळ फुलपाखरू आढळण्याची घटना पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. एफडीसीएमच्या संवर्धनाच्या उपायांमुळे ते शक्य हाेऊ शकले. नैसर्गिक विविधतेचे संवर्धन हाेण्यासाठी नियमित सर्वेक्षण आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्या अनुषंगाने जैवविविधतेचा अभ्यास हाेणे आवश्यक आहे.
- पांडुरंग पखाले, आरएफओ, गाेरेवाडा प्रकल्प