सुमेध वाघमारे
नागपूर : भारतात ओमायक्रॉनच्या ‘बीएफ ७’ सबव्हेरियंटचे चार रुग्ण आढळून आल्याने प्रशासन अलर्टवर आले आहे. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर कोरोना चाचणी करण्याचेही निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञाच्या समितीने नेझल कोरोना व्हॅक्सिनचा बूस्टर डोस म्हणून वापर करण्यास मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, याची मानवी चाचणी नागपुरात यशस्वी पार पडली होती.
आरोग्यतज्ज्ञांच्या समितीने नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला मंजुरी देत बूस्टर डोस म्हणून नेझल कोरोना व्हॅक्सिनची शिफारस केली होती. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नेझल व्हॅक्सिनला तज्ज्ञांच्या समितीने १८ वर्षांवरील नागरिकांच्या वापरासाठी मंजुरी दिल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले. यामुळे दंडावर देणाऱ्या कोरोना लसीची भीती दूर होणार आहे.
-पहिल्या टप्प्यात ५० स्वयंसेवकांवर चाचणी
हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीची इंजेक्शनद्वारे देण्यात येणारी ‘कोव्हॅक्सिन’ लसीची मानवी चाचणी महाराष्ट्रात केवळ नागपुरातील गिल्लूरकर हॉस्पिटलमध्ये झाली. डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांच्या मार्गदर्शनात या चाचणीचे दोन्ही टप्पे यशस्वी पार पाडले. त्यानंतर नाकावाटे देण्यात येणाऱ्या ‘नेझल व्हॅक्सिन’ चाचणीचा पहिला टप्पा याच हॉस्पिटलमध्ये पूर्ण झाला. त्यानंतर याच कंपनीचे ‘हेटेरोजीनस् ट्रायल’मध्ये एक लस नाकावाटे तर दुसरी लस इंजेक्शनद्वारे देण्याची मानवी चाचणी झाली. ही चाचणी ५० स्वयंसेवकांवर झाली. त्याचे चांगले निष्कर्ष पुढे आले.
-बूस्टर डोसचीही मानवी चाचणी
भारत बायोटेक कंपनीचा ‘कोव्हॅक्सिन’ची ‘हेटेरोजीनस् बूस्टर ट्रायल’चीही मानवी चाचणी राज्यात केवळ नागपुरातील गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झाली. यात १८ ते ६५ वयोगटताील ६० वर स्वयंसेवकांवर ही चाचणी यशस्वी पार पडली.
-नाकातच इम्युनिटी वाढविते
‘नेझल व्हॅक्सिन’चा मानवी चाचणीत ‘साइड इफेक्ट’ दिसून आले नाहीत. उलट चांगले रिझल्ट आले. नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीमुळे नाकातील पडद्यावरच (लोकल) इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होत असल्याचे दिसून आले.
-डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर, संचालक गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर