लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : पाैराणिक व पर्यटनाची पार्श्वभूमी आलेल्या रामटेक शहरातून वाहणाऱ्या नाल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आराेग्याची समस्या ऐरणीवर आली आहे. कारण, या नाल्यात माेठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने ताे बुजल्यागत झाला आहे. त्यातील पाणी व्यवस्थित वाहून जात नसल्याने डासांची पैदास वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आराेग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरातील नेहरू चाैकातून नाला वाहताे. त्या नाल्याच्या दाेन्ही काठावर स्थानिक नगर परिषद प्रशासनाने सिमेंटच्या भिंती बांधल्या आहेत. या नाल्याच्या दाेन्ही बाजूला दुकाने आहेत. बहुतांश दुकानदार त्यांच्या दुकानांमधील तसेच परिसरातील नागरिक त्यांच्याकडील कचरा गाेळा करून त्या नाल्यात टाकतात. त्यामुळे नाला पूर्णपणे बुजल्यागत झाला आहे. त्यातच या नाल्यात सांडपाणीही साेडले जाते. कचऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह अवरुद्ध हाेत असून, त्याचे डबके तयार झाले आहे.
डबक्यांमधील कचरा पाण्यामुळे सडत असून, त्याची दुर्गंधी सुटली आहे. या दुर्गंधीचा परिसरातील नागरिकांनाच त्रास हाेत आहे. शिवाय, तिथे अनुकूल वातावरणामुळे डासांची पैदास वाढली आहे. डासांमुळे या नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना मलेरिया व तत्सम आजार हाेण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे या नाल्याची साफसफाई करणे व याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
...
कचराकुंड्यांचा अभाव
रामटेक शहरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. परंतु, कचरा संकलन आणि त्याची याेग्य विल्हेवाट यासाठी प्रभावी उपाययाेजना केल्या जात नाही. पालिका प्रशासनाने या ठिकाणी कचराकुंड्या ठेवण्याची व्यवस्था केली नाही. पालिकेच्या वतीने राेज सकाळी घराघरामधील ओला व काेरडा कचरा गाेळा केला जाताे. त्यावेळी दुकाने बंद राहत असल्याने दुकानदारांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात गैरसाेय निर्माण हाेते.
...
कारवाई करणे आवश्यक
पालिका प्रशासनाने आधी या नाल्याची साफसफाई करून दुकानांसह अन्य महत्त्वाच्या ठिकाणी आधी कचराकुंड्या उपलब्ध करून देणे आणि त्यातील कचऱ्याची नियमित उचल करणे आवश्यक आहे. नाल्यातील कचऱ्यात प्लास्टिक व बाटल्यांचे प्रमाण अधिक आहे. त्याचे विघटन हाेत नाही. कचराकुंड्यांमध्ये प्रतिबंधित वस्तू आढळून आल्यास संबंधितांवर पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई करायला हवी.