लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठी नगरपालिकेतील सत्ताधारी मंडळी विकास कामे करताना पक्षपात करीत असल्याचा गंभीर आरोप करीत पालिकेतील विरोधीपक्ष नेता लालसिंग यादव यांनी चक्क उघड्या नालीच्या काठावर बसून पाय नालीत सोडत गुरुवारपासून आंदोलनाला सुरुवात केली. दरम्यान, प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार बाळासाहेब टेळे यांनी त्यांच्या प्रभागाची पाहणी करून तिथे नालीच्या बांधकामाला सुरुवात केली. तरीही आंदोलन मागे घेण्यात आले नव्हते.कामठी नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता आहे. सत्ताधारी आपल्या प्रभाग क्रमांक १४ मधील विविध विकास कामांच्या बाबतीत पक्षपात करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेता भाजपचे लालसिंग यादव यांना केला. प्रभाग क्रमांक - १४ मध्ये रोडच्या मध्यभागी मोठा खड्डा पडला असून, तो अपघातांना निमंत्रण देत आहे. सत्ताधारी या प्रभागाच्या विकासाकडे मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या प्रभागातील रोड, नाल्या, पिण्याचे पाणी, पथदिवे, कचरा व घाणीची विल्हेवाट यासह अन्य समस्या निर्माण झाल्या आहेत, असेही लालसिंग यादव यांनी सांगितले.या प्रभागांतर्गत येणाऱ्या यादवनगरात नालीवरील स्लॅब तुटल्याने खड्डा पडला आहे. या संदर्भात पालिका प्रशासनाकडे चारदा लेखी तक्रारी केल्या. परंतु, पालिकेच्या बांधकाम विभागाने त्या तक्रारींकडे लक्ष दिले नाही, असा आरोप करीत यादव यांनी सांगितले की, या खड्ड्यामुळे अपघात झाले असून, सत्ताधाऱ्यांकडून या प्रभागातील नागरिकांवर वारंवार अन्याय होत आहे. न्याय मिळत नसल्याने आपण शेवटी आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच प्रभारी मुख्याधिकारी बाळासाहेब टेळे यांनी प्रभाग क्रमांक - १४ ची पाहणी केली. शिवाय, या भागातील नाल्यांच्या दुरुस्तीला तातडीने सुरुवात केली. मात्र, यादव यांचे आंदोलन सुरूच होते.
नागपूर जिल्ह्यातील कामठी नगरपालिका नगरसेवकाचे नालीत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 10:17 PM
कामठी नगरपालिकेतील सत्ताधारी मंडळी विकास कामे करताना पक्षपात करीत असल्याचा गंभीर आरोप करीत पालिकेतील विरोधीपक्ष नेता लालसिंग यादव यांनी चक्क उघड्या नालीच्या काठावर बसून पाय नालीत सोडत गुरुवारपासून आंदोलनाला सुरुवात केली.
ठळक मुद्देप्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी केली पाहणी : विकास कामात पक्षपात केल्याचा आरोप