नागपूर : ते गंभीर आजारामुळे मृत्यूच्या दाढेत पोहचले होते. तेवढ्यात देवाची कृपा होऊन ते वाचले. अशावेळी कुणीही आयुष्यभर स्वत:ला कुरवाळत बसले असते, पण त्यांनी पूर्वीपेक्षाही अधिक जोमाने जगण्याचा निर्धार केला आणि साध्यासुध्या नाही तर, शारीरिक क्षमतेची सतत परीक्षा घेणाऱ्या धावण्याच्या छंदाला उभारी दिली. दरम्यान, त्यांनी तीन वर्षात विविध मॅरेथॉनसह एकूण ८६ स्पर्धांमध्ये सहभागी होऊन निर्धारित अंतर यशस्वीपणे पूर्ण केले. त्यातून ‘जीना इसी का नाम है’ हा संदेश त्यांनी सर्वांना दिला.
या लढवय्या धावपटूचे नाव सचिन जैन असून ते नंदनवन येथील रहिवासी आहेत. ३६ वर्षीय जैन यांना लहानपणापासूनच धावण्याचा छंद होता. शालेय जीवनात त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल मारली होती. परंतु, पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागल्यामुळे त्यांना धावण्याचा छंद जोपासता आला नाही. त्यानंतर कौटुंबिक व व्यावसायिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांचे या छंदाकडे लक्ष गेले नाही. दरम्यान, २०१६ मध्ये पोटाचा गंभीर आजार झाल्यामुळे ते मृत्यूच्या दाढेत पोहचले होते. डॉक्टरांनी ते वाचू शकणार नाही असे जाहीर केले होते. मात्र, जैन यांनी चमत्कारिकरीत्या मृत्यूवर मात केली. त्यावेळी जीवनाचे महत्त्व कळल्याने त्यांनी स्वत:करिता धावण्याच्या छंदाकडे परतण्याचा निर्धार केला. त्यांनी परिश्रमपूर्वक शारीरिक क्षमता वाढवून मॅरेथॉनसह विविध खुल्या स्पर्धांमध्ये धावायला सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी दोन पूर्ण मॅरेथॉन व ५४ अर्ध मॅरेथॉन यासह इतर स्पर्धांमध्ये सहभागी होऊन निर्धारित अंतर धावून पूर्ण केले. त्यासाठी त्यांना पदके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली आहेत.
------------------
सायकलिंग स्पर्धांमध्येही सहभाग
जैन यांनी २०० किमीच्या तीन, ३०० किमीच्या दोन आणि ४०० व ६०० किमी अंतराच्या एकेक सायकलिंग स्पर्धेत सहभागी होऊन संबंधित अंतर यशस्वीपणे पूर्ण केले आहे. तसेच, ते २०१९ साली इंदोर येथील स्टेडियममध्ये सलग १२ तास धावले. दरम्यान, त्यांनी ७२ किलोमीटर धावण्याची नोंद केली. जोडा फाटल्यामुळे त्यांना १०० किलोमीटरचे लक्ष्य पूर्ण करता आले नाही. आता येत्या नोव्हेंबर महिन्यात चंदीगड येथील स्टेडियममध्ये २४ तासात १५० ते १७५ किलोमीटर अंतर धावण्याची त्यांची इच्छा आहे.