नागपूर - नावात काय आहे, असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो आणि त्याचे उत्तरही प्रसंगानुरूप मिळते. नावाच्या महतीचे गोडवेही गायले जाते अन् नावाच्या विरुद्ध कृती करून स्वत:च्याच नावाला काळिमा करण्याचे प्रकारही वेळोवेळी उघड होतात. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक घटना उजेडात आली. ५९ वर्षे वय असलेली आणि सत्यविजया नावाने फिरणारी एक महिला चक्क चोऱ्या करत फिरत होती. पोलिसांनी तिला अखेर अटक केली.
आरोपी महिला वैशालीनगरात राहते. ती दिवसाढवळ्या कुणाच्याही घरात शिरून हात मारत होती. गोळीबार चौकाजवळच्या कमल तुकाराम चावरे या ९ मार्चला दुपारी २ च्या सुमारास ब्लाऊज शिवायला टाकण्यासाठी बाहेर गेल्या. ही संधी साधून सत्यविजया चावरे यांच्या घरात शिरली. तिने कपाट उघडून आतमधील ३० ग्राम सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याची अंगठी असा एकूण एक लाख, २६ हजारांचा ऐवज चोरला. ती जिन्यावरून उतरत असताना चावरे घरी परतल्या. चोरट्या महिलेचे वर्तन चावरे यांना खटकले. त्यामुळे त्यांनी आपल्या शेजारी राहणाऱ्यांना तुमच्याकडे कुणी महिला पाहुणी आली होती का, अशी विचारणा केली. शेजाऱ्यांनी नकार दिल्याने त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्या घरात गेल्या तेव्हा त्यांना कपाटाचे दार उघडे दिसले. त्यातून सोन्याचे मंगळसूत्र आणि अंगठी चोरीला गेल्याचे लक्षात येताच चावरे यांनी तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.
सावज शोधताना सापडली
ठाणेदार तृप्ती सोनवणे यांनी सीसीटीव्ही तपासून नमूद चोरट्या महिलेला बघितले. आपल्या सहकाऱ्यांना त्याची कल्पना दिली अन् तिचा शोध सुरू केला. रविवारी दुपारी तहसीलचे द्वितीय पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे, पीएसआय परशुराम भवाळ आपल्या सहकाऱ्यांसह गोळीबार चौक परिसरात गस्त करीत असताना चोरटी महिला सत्यविजया त्यांच्या नजरेस पडली. तिचे संशयास्पद वर्तन बघून ती सावज शोधत असल्याचा पोलिसांनी अंदाज बांधला. तिला ताब्यात घेत चौकशी केली असता तिने चावरे यांच्याकडील चोरीची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली.
अनेक वर्षांपासून सक्रिय
सत्यविजया अनेक वर्षांपासून चोऱ्या करते. तिचे घरच यावर चालते. तिला अटक करून चार दिवसांचा पीसीआर पोलिसांनी मिळवला असून, तिच्याकडून चावरे यांच्या दागिन्यांव्यतिरिक्त ४ लाख, ६५ हजारांचे सोन्याचे दागिने, ४० हजारांचे चांदीचे दागिने तर २२,५०० रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली. तिने आणखी कुठे कुठे चोऱ्या केल्या, त्याची चौकशी सुरू असल्याचे ठाणेदार तृप्ती सोनवणे यांनी लोकमतला सांगितले.
----