नागपूर : काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त २८ डिसेंबर रोजी नागपुरात ‘है तय्यार हम’ ही महारॅली होत आहे. रॅली होत असलेल्या बहादूरा येथील सभा स्थळाला ‘भारत जोडो मैदान’ असे नाव देण्यात आले आहे. बेरोजगारी, महागाई दूर करण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही तयार आहोत. भाजप प्रणित सरकारने जी परिस्थिती निर्माण झाली त्याला लढा देण्यासाठी आम्ही तयार आहोत, असा विश्वास या रॅलीतून आम्ही जनतेला देणार आहोत, असे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
पटोले म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीत डिसेंबर १९२० मध्ये नागपूरच्या भूमितूनच महात्मा गांधी यांनी जुलमी, अत्याचारी ब्रिटिश सत्तेविरोधात असहकार आंदोलनाचा नारा दिला होता. शेवटी १९४७ मध्ये ब्रिटिशांना भारत देश सोडून पळून जावे लागले हा इतिहास आहे. नागपूरमधूनच १९५९ मध्ये इंदिरा गांधी यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याची घोषणा केली गेली होती. नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण आहे. अशा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या नागपूर शहरातून एक काँग्रेस विचारधारेचा संदेश देण्यासाठी काँग्रेसचा १३८ वा स्थापना दिवस नागपुरात साजरा होत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकाअर्जुन खरगे यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस कार्यसमितीचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. काँग्रेसने रायपूरच्या अधिवेशनात जातीनिहाय जनगणनेचा प्रस्ताव पारीत केला होता. पण संघ परिवाराचा याला विरोध आहे. जातीनिहाय जनगणना झाली तर दूध का दूध होईल. आम्ही देशासाठी विचार करतो, ते स्वत:पुरता विचार करतात, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी
माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सतिश चतुर्वेदी, आ. अभिजीत वंजारी, आ. वजाहत मिर्झा, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, अतुल कोटेचा, उमाकांत अग्नीहोत्री आदी उपस्थित होते.
इंडिया आघाडी जिंकणार- नुकताच एक सर्वे आला असून त्यानुसार काँग्रेससह इंडिया आघाडी जिंकणार असल्याचे स्प्ट झाले आहे. इंडिया आघाडीत आलेले पक्ष हे भाजप विरोधात लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेससोबत आले आहेत. हे पक्ष सीबीआय, ईडी च्या धाकाने
एकत्र आलेले नाहीत. काँग्रेस लोकशाही मानणारा पक्ष आहे. देशाच्या एकतेसाठी काँग्रेसने हे एकत्र केले आहे. सोनिया गांधी यांना दोनदा पंतप्रधान बनण्याची संधी होती. पण त्यांनी देशासाठी त्याग केला. त्यामुळे इंडिया आघाडीतील नेतृत्त्वाचा निर्णयही आघाडी एकत्रित घेईल, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
बॅलेटवर निवडणुका व्हाव्यात- ईव्हीएम बाबत नागरिकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. आपण दिलेले मत त्याच उमेदवाराला गेले की नाही याची मतदाराला खात्री राहिलेली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने भूमिका घ्यायला हवी. जण भावना पाहून निवडणुका बॅलेट वर घेतल्या पाहिजे, अशी मागणी पचोले यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना ईव्हीएमचा विरोध करीत होते, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्य सरकार कर्जात बुडालेले-ज्महायुती सरकारहने मागील वर्षी ९६ हजार कोटींची मागण्या मंजूर केल्या. यावेळी ५५ हजर कोटीच्या मागण्या मान्य केल्या. राज्याचा बजेटच्या बरोबरीत पुरवणी मागण्या ठेवत आहेत. यावरून राज्य कर्जबाजारी झाले आहे हे स्पष्ट आहे. पाशवी बहुमताच्या भरवशावर लूट सुरू आहे, अशी टीकाही पटोले यांनी केली.