(डमी)
नागपूर : शहरातील बाजारपेठेतील काही वर्दळीचे रस्ते वाहतूक पोलिसांनी ‘वन वे’ घोषित केले आहेत. वन वेनुसार या रस्त्यावरून केवळ एकाच बाजूने वाहतुकीची परवानगी आहे. पण ‘वन वे’चे पालनच होताना दिसत नाही. अनेकांना तर रस्ता वन वे असल्याचीही माहिती नाही. वाहतूक पोलीस विभागाकडूनही ‘वन वे’च्या कारवाया होत नाही. त्यामुळे शहरातील ‘वन वे’ केवळ नावाचेच असल्याचे दिसून येत आहे.
- सीताबर्डी मेन रोड
सीताबर्डीतील लोखंडी पुलापासून व्हेरायटी चौकाकडे येणारा मुख्य रस्ता हा ‘वन वे’ आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुकाने आणि रस्त्यावरही किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. हा रस्ता सदैव वर्दळीचा असल्याने लोखंडी पुलाकडून व्हेरायटी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक करण्यास निर्बंध घातले आहे. या रस्त्यावर वाहतूक होऊ नये म्हणून पूर्वी वाहतूक पोलीस तैनात राहायचे. परंतु सध्या या ‘वन वे’वर सर्रास वाहतूक सुरू आहे. येणाऱ्या वाहनांना अडविले जात नाही आणि पोलिसांकडून कारवाईदेखील होत नाही.
- महालातील शिवाजी पुतळा ते कोतवाली पोलीस स्टेशन
महाल परिसरातील शिवाजी पुतळा ते कोतवाली पोलीस स्टेशन चौकाचा मार्ग हा देखील वन वे आहे. व्यापारी पेठांमुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. पण हा रस्ता वन वे आहे, हे कुणालाही माहीत नाही. या रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहतूक सातत्याने सुरू असते. शिवाजी पुतळ्याजवळ पोलिसांची चौकी आहे. पण कधी वाहनांना थांबविले जात नाही. वाहन चालकांना हा रस्ता वन वे असल्याची कल्पनाही नाही.
- जुना भंडारा रोड
इतवारी परिसरातून जाणारा जुना भंडारा रोड हा देखील वाहतुकीची होत असलेली कोंडी लक्षात घेता ‘वन वे’ घोषित करण्यात आला आहे. पण या रस्त्यावरदेखील दोन्ही बाजूने वाहनांची वर्दळ सदैव असते. कुणाचीही अडवणूक नाही, पोलिसांची उपस्थिती नाही, त्यामुळे कारवाईचा प्रश्नच नाही.
- पोलिसांकडून ‘वन वे’ची कारवाई होत नाही
‘वन वे’चे नियम तोडले तरी पोलिसांकडून कारवाई होत नाही. त्यामुळे वाहतूक पोलीस कर्मचारीसुद्धा ‘वन वे’वर उपस्थित नसतात, अशी माहिती वाहतूक पोलीस विभागाकडून मिळाली.