नरखेड : काटोल-नरखेड मतदार संघातील मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. नरखेड तालुक्यात मतदार यादीचे १४६ भाग आहेत. त्यापैकी ३१ मतदार यादीच्या भागामध्ये ७७१ मतदारांचे फोटो त्यांच्या नावासमोर नाहीत. त्यामुळे अशा मतदारांनी ३० जूनपर्यंत रंगीत पासपोर्ट फोटो निवडणूक कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. जे मतदार फोटो जमा करणार नाहीत त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील, अशी माहिती तहसील प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. ज्यांच्या नावासमोर फोटो नाही अशांचे फोटो गोळा करण्याचे काम बीएलओ करीत होते. जे स्थलांतरित मतदार आहे त्याच्या घरी बीएलओ वेगवेगळ्या तीन दिवशी जाऊन आले आहेत. जे स्थलांतरित मतदार मतदान यादीवर दिलेल्या पत्यावर आढळून आले नाही. अशा मतदारांची यादीही तयार करण्यात आली आहे. ती तालुक्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनासुद्धा देण्यात आल्याची माहिती तहसीलदार डी.जी.जाधव, नायब तहसीलदार (निवडणूक) विजय डांगोरे यांनी दिली आहे.
६७१ मतदारांची नावे मतदान यादीतून वगळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:11 AM