हायकोर्टात कामकाजासाठी न्यायमूर्तींची नावे निश्चित : अधिसूचना जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 10:37 PM2020-04-15T22:37:18+5:302020-04-15T22:38:51+5:30
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा काळ वाढविण्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये कामकाजाच्या पुढील तारखा व न्यायमूर्तींची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा काळ वाढविण्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठामध्ये कामकाजाच्या पुढील तारखा व न्यायमूर्तींची नावे निश्चित करण्यात आली आहेत. मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांच्या निर्देशानुसार यासंदर्भात बुधवारी अधिसूचना जारी करण्यात आली.
२० व २३ एप्रिल रोजी न्या. नितीन सांबरे हे दिवाणी प्रकरणे व न्या. विनय जोशी हे फौजदारी प्रकरणे, २७ व ३० एप्रिल रोजी न्या. मनीष पितळे हे दिवाणी प्रकरणे व न्या. मुरलीधर गिरटकर हे फौजदारी प्रकरणे तर, ५ मे रोजी न्या. अनिल किलोर हे दिवाणी प्रकरणे व न्या. श्रीराम मोडक हे फौजदारी प्रकरणांचे कामकाज पाहतील. या सर्व तारखांना केवळ अत्यंत तातडीची सुनावणी आवश्यक असलेली प्रकरणेच ऐकली जातील. कामकाजाची वेळ दुपारी १२ ते २ वाजतापर्यंत राहील.
कोरोनाचा फैलाव होऊ नये याकरिता उच्च न्यायालयात विविध प्रकारची सावधगिरी बाळगली जात आहे. त्यानुसार, सर्व प्रकरणांवर केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली जाईल. न्यायमूर्ती व वकील वेगवेगळ्या कक्षातून कामकाज करतील. कक्षात एकावेळी केवळ एकाच प्रकरणाशी संबंधित वकिलांना प्रवेश दिला जाईल. इतरांना बाहेर उभे राहावे लागेल. न्यायालयात आल्यानंतर तोंडाला मास्क व हाताला सॅनिटायझर लावणे, सोशल डिस्टन्सिंग इत्यादी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.