कुही : निवडणूक आयाेगाने मतदार यादीत मतदाराचे छायाचित्र अनिवार्य केले आहे. त्यामुळे आता छायाचित्र नसणाऱ्यांची नावे मतदान यादीतून वगळली जाणार आहेत. कुही तहसील कार्यालयात नुकतीच बीएलओची सभा पार पडली. यात मतदारांची दाेनदा नावे, मतदार यादीत छायाचित्र नाही, अशा मतदारांचा शाेध घेऊन त्यांच्या छायाचित्रासह मतदार याद्या अद्ययावत करा, अशा सूचना देण्यात आल्या.
सभेत मतदार याद्यांचा आढावा घेण्यात आला. काही मतदारांची दाेन ठिकाणी नावे आली आहेत. अशी नावे कमी करा. हे कार्य लक्षपूर्वक करण्यात यावे, अन्यथा एखाद्या मतदाराचे नाव कमी करण्याच्या नादात दाेन्ही यादीतील नावे कमी हाेईल व मतदार मतदानापासून वंचित राहील, याकडेही अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. मतदार यादी अद्ययावत करताना प्रत्येकाने काळजी घ्यावी, अशा सूचना नायब तहसीलदार उपेश अंबादे, प्रकाश हारगुडे, वामन पंचबुद्धे यांनी केल्या. यावेळी मंडळ अधिकारी हिंदलाल उके, ताेटे, बेले आदी उपस्थित हाेते. अधिकाऱ्यांनी मतदान यादी शुद्धीकरण करण्याबाबत मार्गदर्शन केले. यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची छायाचित्रे जमा करून अपलाेड करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी केंद्रनिहाय मतदार याद्यांचा आढावा घेण्यात आला.