नागपूर : विरोधी पक्षांनी आपल्या आघाडीला ‘इंडिया’ नाव देणे बरोबर नाही. योग्य नाही. त्यांनी काहीही नाव दिले असले तरी आम्ही मात्र विरोधकांच्या आघाडीचा उल्लेख ‘आयएनडीआयए’ असाच करू, असे रिपाइं (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे पत्रपरिषदेत स्पष्ट केले.
केंद्र सरकारच्या एका कार्यक्रमानिमित्त ते सोमवारी नागपुरात आले असता रविभवन येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आठवले म्हणाले, लोकशाहीत विरोधकांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी आरोप प्रत्यारोप करावे, परंतु सध्या विराेधक काहीही चुकीचे आरोप करताहेत. विरोधकांनी कितीही आघाडी केली तरी २०२४ च्या निवडणुकीतही पुन्हा मोदींनाच संधी मिळेल. ३५० पेक्षा अधिक जागा एनडीएला मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय राज्यमंत्री पदाबाबत आपण समाधानी असून रिपाइंचा देशभरात विस्तार होत असल्याचेही त्यांनी सांगितले.पत्रपरिषदेत पक्षाचे ज्येष्ठ नेते भूपेश थुलकर, डॉ. पूरण मेश्राम, विजय आगलावे, राजन वाघमारे, बाळू घरडे आणि विनोद थुल उपस्थित होते.
- रिपाइंला हव्या लोकसभेच्या १२ जागा
एनडीएचा घटक असलेल्या रिपाइं (आ) ला आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील २ जागांसह देशात १२ जागा मिळाव्यात, अशी मागणी आठवले यांनी यावेळी केली. महाराष्ट्रातील शिर्डी लोकसभेतून आपण स्वत: निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वालाही कळविल्याचे स्पष्ट केले. तसेच विधानसभा निवडणुकीत सध्याचे राजकीय चित्र पाहता किमान १२ जागा मिळाव्या, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारात रिपाइंलाही प्रतिनिधीत्व देण्याची मागणीही त्यांनी केली.
- संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांवर व्हावी कारवाई
संविधान कुणीही बदलू शकत नाही. बदलणार नाही. असे असले तरी काही जण सातत्याने संविधान विरोधी वक्तव्य करताहेत, अशा व्यक्तिंविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी आपण स्वत: पंतप्रधानांना पत्र लिहून करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
- सुलेखा कुंभारे यांना पक्षात येण्याचे आवाहन
यावेळी रामदास आठवले यांनी सुलेखा कुंभारे यांच्यासह रिपाइंच्या इतर छोट्या गटांना आपल्या पक्षात सामील होण्याचे आवाहन केले. सुलेखा कुंभारे या समाजात उत्तम काम करताहेत. त्यांचे चांगले नेतृत्व आहे, असेही ते म्हणाले.