नागपूर: महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा उद्धव सेनेला सोडण्यात आल्यामुळे काँग्रेस नेते आ. विश्वजित कदम कमालीचे नाराज आहे. कदम हे सोमवारी रात्री नागपुरात दाखल झाले व १.३० च्या सुमारास त्यांनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व गटनेते बाळासाहेब थोरात यांची एका हॉटेलमध्ये भेट घेत नाराजी व्यक्त केली. सोबत सांगलीची जागा काँग्रेसनेच लढावी, असा आग्रह कायम ठेवला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर ही बैठक चालली. बैठकीत आ. विक्रांत सावंत, पृथ्वीराज पाटील देखील उपस्थित होते. बैठकीनंतर मंगळवारी सकाळी कदम पुण्यासाठी रवाना झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना विश्वजित कमद म्हणाले, पटोले, थोरात यांनी आपल्याला तत्काळ बोलावले होते. त्यांच्याशी चर्चा झाली. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासोबतही फोनवरून संभाषण झालं. यावर लवकर तोडगा काढावा जेणेकरून सांगली लोकसभेत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना एक ठोस पाऊल घेता येईल, अशी भूमिका आम्ही मांडली. विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्जासोबत
काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडला नाही. मात्र शेवटच्या क्षणालाही एबी फॉर्म जोडला जाऊ शकतो. त्यांनी एक काँग्रेस व एक अपक्ष, असे दोन फॉर्म भरले आहेत. सांगली जिल्ह्याची जागा काँग्रेसला मिळावी त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न केला. राज्यात
महाराष्ट्रात महाविकास आघाडी करीता अत्यंत चांगलं वातावरण आहे. यासाठी काय निर्णय घ्यायचे ते ज्येष्ठांनी ठरवावे, असे सांगत त्यांनी चेंडु ज्येष्ठ नेत्यांच्या कोर्टात टोलवला.
विशाल पाटील चुकीचे पाऊल उचलणार नाहीत : थोरात
- सांगली आणि भिवंडीचा तिढा आजही आमच्यासाठी आहे. दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांची चर्चा करण्यासाठी काही लोक काल रात्री आले होते. विशाल पाटील यांच्याकडे अजूनही काँग्रेसचा एबी फॉर्म नाही. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये विशाल पाटील यांचे नाव होतं. सांगलीची जागा आम्हाला मिळावी अशी अपेक्षा होती. पण जेव्हा आघाडीत आपण पुढे जात असतो. त्याचे काही फायदे तोटे तोटेही स्वीकाराचे असतात. स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व मी देखील विशाल पाटील यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत आहोत. ते चुकीचे पाऊल उचलणार नाहीत, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.