नागपूर : कुणाच्या घरातील भांडणाशी पक्षाला काहीही देणेघेणे नाही. काँग्रेसला आता महाराष्ट्रात चांगले यश मिळू लागले आहे. भविष्यातही हा आलेख असाच वाढणार आहे. कदाचित हे कुणाला रुचत नसेल. म्हणून माझी बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू झाले असतील. ‘जिसका नाम होता है, उसी को बदनाम किया जाता है’, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षांतर्गत विरोधकांना टोला लगावला.
बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याकडे लक्ष वेधले असता पटोले म्हणाले, आज बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे. सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो. बाळासाहेबांना दीर्घायुष्य लाभो.
१५ फेब्रुवारीला कार्यकारिणीची बैठककाँग्रेस प्रदेश कार्यकारिणीची बैठक दर तीन महिन्यांनी घ्यायची असते. काही लोक तर वर्ष-वर्षभर बैठक घेत नव्हते. गेल्या महिन्यात नागपुरात प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. पुन्हा १५ फेब्रुवारीला कार्यकारिणी बैठक होत आहे. त्यात कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीबाबत रणनीती आखली जाईल.
थोरात भाजपमध्ये आले तर स्वागतच : बावनकुळेमुंबई : पक्षविस्तार हे कोणाचेही उद्दिष्ट असते, असे म्हणत बाळासाहेब थोरात इच्छुक असतील तर त्यांना सन्मानाने भाजपमध्ये प्रवेश देऊ, असे विधान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले. कुणालाही भाजपमध्ये यायचे असेल तर ते येऊ शकतात, असेही ते म्हणाले.
केदारांकडून थोरात यांची पाठराखणपटोले-थोरात यांच्या राजकीय वादात आता माजी मंत्री सुनील केदार यांनी उडी घेत थोरात यांची पाठराखण केली आहे. ज्या कुटुंबाच्या दोन पिढ्यांनी काँग्रेससाठी सर्वस्व पणाला लावले, त्यांच्याबाबत निर्णय घेताना इतर नेत्यांशी चर्चा करायली हवा होती, असे केदार यांनी म्हटले आहे.
बाळासाहेब थाेरात यांनी राजीनामा दिला की, पत्र लिहिले हे माहिती नाही; परंतु, काँग्रेसमध्ये लवकरच सर्वकाही ठीक हाेईल.- सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री.
बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला, याविषयी मला माहिती नाही. मात्र, नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसची हक्काची जागा होती. ती आता असणार नाही. त्यामुळे विधान परिषदेतील काँग्रेसचे संख्याबळ एकने कमी होणार आहे. - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री.