पटोले बोलेना, बावनकुळेही पत्ते उघडेनात; उमेदवारीसाठी शिक्षक नेते वेटिंगवर
By कमलेश वानखेडे | Published: January 3, 2023 10:32 AM2023-01-03T10:32:19+5:302023-01-03T10:35:15+5:30
शिक्षक परिषदेच्या पत्राला भाजपकडून तर शिक्षक भारतीच्या पत्राला काँग्रेसकडून उत्तर नाही
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असली तरी उमेदवारीबाबत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या दोन्ही नेत्यांनी पत्ते उघडलेले नाहीत. शिक्षक परिषदेने बावनकुळे यांना पत्र लिहून तर शिक्षक भारतीने पटोले यांना पत्र लिहून समर्थन मागितले होते. मात्र, एकाही प्रदेशाध्यक्षाने पत्राला उत्तर दिलेले नाही. त्यामुळे इच्छुक शिक्षक उमेदवार वेटिंगवर असून त्यांचे टेन्शन वाढले आहे.
शिक्षक मतदारसंघासाठी ३० जानेवारी रोजी मतदान होईल. ५ ते १२ जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करायचे असून १३ जानेवारीला छाननी होईल. १६ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. अर्ज भरण्याची तारीख तोंडावर आली असली तरी दोन्ही प्रमुख पक्षांनी उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केलेले नाही. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून दोनदा विधान परिषदेत पोहोचलेले नागो गाणार आता हॅट्ट्रिकसाठी रिंगणात उतरण्यास सज्ज आहेत. भाजपने गाणार यांना समर्थन, सहकार्य व पाठिंबा जाहीर करावा, अशी मागणी करणारे पत्र शिक्षक परिषदेने ३ ऑक्टोबर २०२२ रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले होते. मात्र, तीन महिन्यांनंतरही बावनकुळे यांनी या पत्राला उत्तर दिलेले नाही. दोन टर्मपासून भाजपच्या ताब्यात असलेली ही जागा पुन्हा एकदा कायम राखण्यासाठी भाजपने गोळाबेरीज सुरू केली आहे.
विद्यमान आमदार नागो गाणार यांच्याऐवजी यावेळी दुसऱ्याला संधी द्यावी, असा पक्षात सूर आहे. गाणार यांना थांबविण्याचा निर्णय झाल्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून नागपूर विभाग कार्यवाह योगेश बन यांचे नाव समोर केले जाऊ शकते. यावेळी उमेदवारीसाठी भाजप शिक्षक सेलनेही आग्रह धरला आहे. भाजपच्या शिक्षक सेलच्या महाराष्ट्र संयोजक व शिक्षण मंचच्या अध्यक्ष माजी महापौर कल्पना पांडे, शिक्षक सेलचे विदर्भ संयोजक अनिल शिवनकर व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांचेही नाव चर्चेत आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक भारतीने आपला उमेदवार न देता काँग्रेसला पाठिंबा द्यावा व त्या बदल्यात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस आपला उमेदवार न देता शिक्षक भारतीला पाठिंबा देईल, असा तह काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत झाला होता. याचे स्मरण करून देणारे पत्र शिक्षक भारतीने २ ऑक्टोबर रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले होते. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी पटोले यांची अनेकदा प्रत्यक्ष भेटही घेतली. मात्र, पटोले यांनी अद्याप कुणालाही समर्थन जाहीर केलेले नाही.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडूून चंद्रपूरचे सुधाकर अडबाले रिंगणात उतरले आहेत. माजी आमदार विश्वनाथ डायगव्हाणे यांच्यावेळी काँग्रेस विमाशिला मदत करायची. त्यामुळे जुन्या सलगीचा हवाला देत विमाशिला काँग्रेसच्या समर्थनाची आशा आहे. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसने ४९ सदस्यांची केंद्रीय समन्वय समिती नेमली आहे. डॉ. बबनराव तायवाडे हे या समितीचे मुख्य समन्वयक आहेत. मात्र, तायवाडे यांनीही उमेदवारी कुणाला या मुद्यावर ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.
गाणार म्हणतात, मी नाही थांबणार....
- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभागाची बैठक रविवारी पं. बच्छराज व्यास विद्यालय, राजाबक्षा येथे झाली. या बैठकीत नागो गाणार यांनी पुन्हा निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्वांना संघटनेच्या अस्तित्वासाठी एकत्र येत लढायचे आहे. आपल्याकडे पैसा नाही तर कार्यकर्त्यांकडून मदत निधी गोळा करू पण लढू, असा संकल्प त्यांनी व्यक्त केला. या बैठकीनंतर गाणार यांची टीम कामाला लागली आहे.