नाना पटोले म्हणाले, समीर वानखेडे 'पोपट'.. त्याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2022 01:37 PM2022-05-28T13:37:37+5:302022-05-28T16:12:50+5:30
देश वाचवणं आता काँग्रेसची जबाबदारी आहे आणि त्यासाठी तरुणांना प्रशिक्षण देण्याचं काम या शिबिरातून होईल, असे पटोले म्हणाले.
नागपूर : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यनला मोठा दिलासा मिळाला आहे. आर्यन खानला कोर्टाकडून क्लीन चिट मिळाली आहे. तर, या प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे तत्कालीन मुंबई प्रमुख समीर वानखेडे यांच्याविरोधात चौकशी सुरू होणार असल्याची माहिती आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
केंद्रीय तपास यंत्रणेचा सातत्याने दुरुपयोग होत आहे, हे आम्ही आधीपासूनच सांगत आहोत. आर्यन खान प्रकरणातही काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली होती. समीर वानखेडेवर कुठलीही कारवाई होणार नाही. कारण, वानखेडे केंद्रीय तपास यंत्रणेतील एक पोपट होता आणि या पोपटावर कुठलीही कारवाई होणार नाही हे आपल्याला येत्या काळात दिसून येईल, असे पटोले म्हणाले.
सोशल मीडिया सेशन
भाजप दररोज ४० कोटी रुपये खर्च करुन देशभरात जे काम करत आहे ते काम काँग्रेस करणार नाहीय वस्तूस्थिती समाजासमोर मांडणं ही भूमिक काँग्रेसची सातत्याने राहिली आहे. काँग्रेसचे जे कार्यकर्ते सोशल मीडियात काम करत आहेत त्यांना आणखी ट्रेनिंग देणं, अलिकडच्या स्पर्धेत कसं टिकता येईल यावर देशव्यापी काँग्रेस कार्यकर्त्यांचं सेशन ठेवलं आहे, असे पटोले यांनी सांगितलं.
राणा दाम्पत्याकडून आज नागपुरात हनुमान चालीसा पठण केलं जाणार आहे. याबाबत प्रश्न विचारला असता हनुमान चालीसा हा आस्थेचा विषय आहे, मी हनुमान चालीसा वाचून घरून निघतो. याचं राजकारण कशासाठी ? तसेच, देशात महागाईसारखे प्रश्न असताना धार्मिक मुद्द्यावरुन राजकारण सुरू आहे, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली.