नागपूर : कुणाच्या घरातील भांडणाशी पक्षाला काहीही देणेघेणे नाही. कॉंग्रेसला आता महाराष्ट्रात चांगले यश मिळू लागले आहे. भविष्यातही हा आलेख असाच वाढणार आहे. कदाचित हे कुणाला रुचत नसेल. म्हणून माझी बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू झाले असतील. ‘जिसका नाम होता है, उसी को बदनाम किया जाता है’, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षांतर्गत विरोधकांना टोला लगावला.
नागपूर शिक्षक मतदारंघ व अमरावती पदवीधर मतदारसंघातील यशानंतर पटोले मंगळवारी प्रथमच नागपुरात आले. यावेळी पत्रकारांनी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याकडे लक्ष वेधले. यावर पटोले म्हणाले, आज बाळासाहेब थोरात यांचा वाढिवस आहे. सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो. बाळासाहेबांना दीर्घायुष्य लाभो आणि आणखी राजकीय उत्कर्ष होवो, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
बाळासाहेबांशी आमचा संपर्क नाही, ते आमच्याशी बोलतच नाहीत- नाना पटोलेंचा खुलासा
महाविकास आघाडीचे नेते एकोप्याने राहिल्यामुळे एवढे मोठे यश मिळाले आहे. या यशामुळे भाजपच्या पोटात दुखते आहे. ते म्हणतात की नाकाखालून सरकार पाडलं, पण आम्ही त्यांच्या नाकातला बाल काढला. आता महाराष्ट्रात काँग्रेसचे अच्छे दिन सुरू झाले आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.
१५ फेब्रुवारीला कार्यकारिणीची बैठक
- कॉंग्रेस प्रदेश कार्यकारिणीची बैठक दर तीन महिन्यांनी घ्यायची असते. पण काही लोक तर वर्ष-वर्षभर ती बैठक घेत नव्हते. गेल्या महिन्यात नागपुरात आमची प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. आता पुन्हा १५ फेब्रुवारीला कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत भार जोडो यात्रेत पायी चाललेल्यांचा सत्कार, विजयी आमदारांचा सत्कार केला जाणार आहे. सोबत कसबा व चिंचवड येथील पोट निवडणुकीबाबतही या बैठकीत रणणिती आखली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.