१६ एप्रिलपर्यंत नाना पटोले गुवाहाटीत असतील.., काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 11:52 AM2023-04-04T11:52:29+5:302023-04-04T11:58:16+5:30
नाना पटोलेंना दर महिन्याला एक खोका मिळतो, असाही आरोप त्यांनी केलाय
नागपूर : गेल्याा काही काळापासून काँग्रेसमधील नेत्यांमध्ये या ना त्या कारणावरून धुसफूस सुरू असून सर्व काही आलबेल नसल्याच्या वार्ता सातत्याने येत असतात. यातच एका काँग्रेस नेत्याने नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अनुपस्थित राहिल्यानंतर चर्चांना पुन्हा पेव फुटले असून आता १६ एप्रिलला नागपुरात होणाऱ्या सभेपर्यंत पटोले हे गुवाहाटीला पोहोचलेले असतील असा आरोप या नेत्याने केलाय.
राज्यात काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये आपआपसांत अनेक कारणांवरून निर्माण झालेल्या समज-गैरसमजामुळे सद्यपरिस्थिती काही बरी नसल्याचे दिसते. यातच काँग्रेसच्या एका नेत्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत. नाना पटोलेंना दर महिन्याला एक खोका मिळतो, असा आरोप काँग्रेसचे आशिष देशमुख यांनी केलाय. यासह, १६ एप्रिलला पटोले गुवाहाटीत असतील, असंही देशमुख म्हणाले आहेत. नागपुरात एबीपी माझाच्या प्रतिनिधीशी बोलताना देशमुख यांनी पटोलेंवर हे गंभीर आरोप केले आहेत.
काय म्हणाले देशमुख..
छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेला नाना पटोले गैरहजर होते. मात्र, त्यानंतर ते ठणठणीत असल्याचं वक्तव्य नुकतचं आलंय. त्यावरून आपण जी माहिती घेतली त्यात असं लक्षात आलं की, प्रदेशाध्यक्ष हे सुरतच्या मार्गावर होते आणि सुरतच्या मार्गावर कोण असतं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. १६ तारखेला मविआची नागपुरात सभा आहे तोपर्यंत आमचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे गुवाहाटीपर्यंत पोहोचल्याचे आपल्याला पाहायला मिळेल, असं देशमुख म्हणाले.
पुढे बोलताना देशमुख म्हणाले, ''संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे की आशिष देशमुख जे बोलतो त्याच्या मागे जर वजन असेल तरच बोलतो. महिन्याच्या एक खोका नक्कीच त्यांना जात आहे. म्हणून आपल्या लक्षात येईल की या नवीन सरकारमधील जे प्रमुख आहे त्यांच्या विरोधामध्ये बोलताना आमचे प्रदेशाध्यक्ष कधीच दिसत नाहीत. पण उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात, भाजपच्या विरोधात सातत्याने बोलताना दिसतात. पण मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ते बोलताना दिसत नसल्यामुळे यामागे तो खोका कारणीभूत आहे का? हा देखील प्रश्न आज पुष्कळशा लोकांना मुंबईच्या वर्तुळात पाहायला मिळतोय.''
नाना पटोले सुरतच्या मार्गावर?
नागपूर विभागातून आमचे प्रदेशाध्यक्ष येतात. नागपूर विभागाची महाविकास आघाडीची सभा येत्या १६ तारखेला येथे होत आहे. त्याची तीळमात्रही जबाबदारी त्यांनी घेतलेली नाहीये. संपूर्णत: जबाबदारी ही दुसऱ्या मोठ्या नेत्याकडे आहे. यावरून लक्षात घेता येईल की संभाजीनगरच्या सभेत सुरतच्या मार्गावर असलेले आमचे प्रांताध्यक्ष हे १६ तारखेच्या नागपुरच्या सभेपर्यंत गुवाहाटीला पोहोचलेले आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील असा आरोप देशमुख यांनी केलाय.
सावरकर संदर्भात राहुल गांधींना सल्ला
सावरकर हे महान स्वातंत्र्यसंग्राम सेनानी आहेत. त्यांच्याबद्दल वक्तव्य करून अनाठायी वाद काढण्यामध्ये कुठेतरी राहुल गांधी यांनी थांबलं पाहिजे. ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी वीरांनी जो लढा त्यांनी दिलाय त्यासाठी त्यांचा आदरच केला पाहिजे. यासंदर्भात शरद पवार यांनीही राहुल गांधी यांचे कान टोचले असून माझी अपेक्षा आहे की, यापुढे राहुल गांधी यांच्या तोंडून सावरकर यांच्याबद्दल काही अनुद्गार निघणार नाही, असं देशमुख म्हणाले. आता या आरोपांवर पटोले काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.