नागपूर: सांगली व भिवंडीच्या जागेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धवसेना व शरद पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव सेनेचे नेते सांगलीत चाचपणी करायला गेले, तेथे अवस्था काय आहे हे दिसून आले. इकडे भिवंडीत शरद पवार यांनी उमेदवार जाहीर केला. महाविकास आघाडीचा धर्म वरिष्ठ नेत्यांकडूनंही पाळला जात नाही, अशी नाराजी नाना पटोले यांनी शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
पटोले म्हणाले, परवा आमची सरद पराव यांच्याशी बैठक झाली. तेव्हा त्यांना आम्ही सांगितले की विदर्भात आम्ही लाट तयार केली. तुमच्याकडे उमेदवारही नव्हते. तरी आम्ही तुम्हाला जिंकण्याची व्यवस्था केली आहे. सांगली आणि भिवंडीत काही करु नका, नाही तर तिकडे त्याचे परिणाम होतील, असेही आपण पवार यांना त्या बैठकीत सागून आलो आहे. सांगली व भिवंडी या दोन्ही जागेचा प्रस्ताव आम्ही हायकमांडला दिला आहे. हायकमांड त्यासंदर्भात निर्णय घेतील, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
या दोन जागांसह मुंबईतील एका जागेचा प्रश्न होता. हा प्रश्न सामोपचाराने सोडवायला हवा होता. पण ते सोडून एकतर्फी उमेदवार जाहिर करणे योग्य नाही. विदर्भात तुम्हाला आम्ही कसं सांभाळून घेतलं. पण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण वेगळे आहे. याचा फरक ते समजायला तयार नसतील तर योग्य नाही. या पद्धतीने उमेदवार जाहिर केल्यास कार्यकर्यांमध्ये रोष वाढेल. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी यावर विचार करावा, असा सल्लाही पटोले यांनी दिला.
वंचितसोबत आघाडी करण्यास तयार
वंचीतसोबत आघाडी करून दोन जागा देण्यास आम्ही तयार आहोत. मी माझा अधिकार वापरून काँग्रेसकडून दोन जागा देण्यास प्रस्ताव दिला आहे. मतविभाजन करु नका अशी विनंती मी त्यांना केली आहे. अकोला येथील आमचा उमेदवार जिंकत आहे. तरीही प्रस्ताव दिला आहे. माझ्या अपमानापेक्षा लोकशाही महत्त्वाची आहे. मी पण मागास, ओबीसी आहे, असेही पटोले म्हणाले.