नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ज्या मोदीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते तो गावगुंड मोदी अखेर नागपुरात अवतरला. ॲड. सतीश उके यांनी या तथाकथित गावगुंड मोदीला शुक्रवारी पत्रकारांसमोर आणले. मात्र, पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना या ‘मोदी’ला चांगलाच घाम फुटला. भंडारा जिल्ह्याच्या गोंदी या गावातील हा गावगुंड मोदी दारू विकतो, पितो आणि त्यातूनच त्याने नाना पटोले यांच्याविरोधात अपशब्द बोलले आणि त्यांच्या विरोधात प्रचार केला, असा दावा ॲड. सतीश उके यांनी केला. मुळात या मोदीचे मूळ नाव उमेश घरडे ऊर्फ मोदी असे आहे. अनेक लोक त्याच्या मागे लागले. त्यामुळे तो घाबरून आपल्याकडे आला आणि आपण त्याला माध्यमांसमोर आणल्याचे उके यांनी सांगितले. आपण दारू विकत होतो, दारू पितो, पत्नी आपल्याला सोडून गेली, आपण नाना पटोले यांना दारूच्या नशेत शिव्या दिल्या आणि विरोधात प्रचार केला, असे सांगत २०२० पासून आपल्याला ‘मोदी’ असे टोपण नाव पडल्याचे त्याने सांगितले. मात्र, मोदी नाव कसे पडले, हे तो सांगू शकला नाही.
पटोलेंचा ‘तो’ गावगुंड मोदी अखेर अवतरला; प्रश्नांची उत्तरे देताना मात्र घाम फुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 9:40 AM