नागपूर : ललित टेकचंदानी आणि त्यांच्या लोकांनी यांनी १३ वर्षांपासून सदनिका देतो, असे सांगून शेकडो लोकांकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. पैसे घेतले, पण त्यांना सदनिका दिल्या नाहीत आणि त्यांचे पेसैही परत केले नाहीत. तेच टेकचंदानी गुरुवारी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत कसे काय दिसत होते, असा सवाल करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संघ परिवारालाच लक्ष्य केले.
पटोले म्हणाले, या कार्यक्रमात टेकचंदानी यांचा मुक्त संचार होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमवेतही ते वारंवार दिसले. यावरून हा माणूस भाजप आणि संघाच्या अगदी जवळचा आहे, हे लक्षात येते. जनतेचे पैसे लुटणाऱ्याला जर संघ संरक्षण देत असेल, तर मग संघ जनतेला लुटणारी संघटना आहे का, असा सवाल करीत सरसंघचालक मोहन भागवत यांनी या प्रकरणात लक्ष घालून पिडीत लोकांना न्याय द्यावा, अशी मागणीही पटोले यांनी केली.
पटोले म्हणाले, टेकचंदानी यांना नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटमध्ये संचालक बनवण्यात आले आहे. ते आरएसएसमध्ये मोठ्या पदावर ते असतीलही. याप्रकरणी पोलिसांकडून साधी तक्रारही घेतली जात नाही. सरकारही न्याय देण्यास तयार नाही. उलट टेकचंदानी आजही पैसे परत न करता त्याच लोकांना धमकावत आहेत. ज्या लोकांना फसवण्यात आले आहे, ते सर्व हिंदू आहेत. त्यामुळे आता डॉ. भागवत यांनीच न्याय द्यावा, अशी मागणीही पटोले यांनी केली.